Wednesday 30 October 2019

एकतेचा संदेश देत धावले औरंगाबादकर…

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

औरंगाबाद,दिनांक 31 (जिमाका)- लोहपुरुष,देशाचे माजी उपप्रधानमंत्री, गृहमंत्री सरदारवल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी राष्ट्रीय एकतेचा संदेशदेण्यासाठी  एकता दौड (रन फॉर युनिटी) कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.औरंगाबादेत आज सकाळी क्रांती चौक ते महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) पर्यंतएकता दौडचे आयोजन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले होते. या एकता दौडमध्ये नागरिकांचाउत्स्फूर्त प्रतिसाद होता. क्रांती चौक येथे आयोजित कार्यक्रमास सुरूवातीला सरदार वल्लभभाई पटेल तसेच श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला महापौरनंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनीपुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच सर्व उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथदेऊन एकता दौडला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवली.  तसेच दौडमध्ये सहभागीही झाले.  दौडमध्ये लहान मुलांसह युवक-युवती, पोलीसअधिकारी-कर्मचारी यांच्यासह महसूल, क्रीडा, महानगरपालिका आदीविभागातील अधिकारी- कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.                                                      *विजेत्यांना बक्षीसांचे वितरण*
 तीन टप्प्यात विभागलेल्या एकता दौडमधील सहभागी स्पर्धकांना मान्यवरांनी बक्षीस देऊन गौरविले. पाच कि.मी गटामध्ये प्रथम,द्वितीयआणि तृतीय अनुक्रमे संतोष वाघ, परवेज महेबूब आणि गौतम वाकळे यांनी क्रमांकपटकावला. तीन कि.मीमध्ये राम लिंभारे, ‌ऋषीकेश लिंभारे, साई अंबे यांनी तर दीड कि.मीमध्येपुरूष गटामध्ये अभिषेक निंबाळे, ऋषीकेश  जैस्वाल, अजय वाघ आणि महिला गटामध्ये सुमय्यामहेबूब सय्यद, वैदेही लव्हांडे व आम्रपाली अंभोरे विजेते ठरले. विजेत्यांना मान्यवरांच्याहस्तेचषक देऊन गौरविण्यात आले. तर पाच वर्षीय चिमुकला दानिश आमेर शेख याने स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल त्याचेही कौतुक मान्यवरांनी केले.





संचालक (माहिती) कार्यालयाने घेतली
भ्रष्टाचार निमुर्लनाची शपथ


        औरंगाबाद, दि. 30(विमाका)  – ‘दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त’ संचालक (माहिती) माहिती व जनसंपर्क विभागीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचा-यांना संचालक गणेश रामदासी यांनी आज भ्रष्टाचार निमुर्लनाची सत्यनिष्ठा शपथ दिली.
         या वेळी बुलढाणा जिल्हा माहिती अधिकारी शंकर बावस्कर तसेच जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्र, औरंगाबाद येथील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थीत होते.  शपथ घेतल्यानंतर दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिलेल्या संदेशाचे माहिती सहायक शाम टरके यांनी वाचन केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा महत्व  माहिती सहायक रेखा पालवे यांनी विशद केले.
        राज्यात दरवर्षी दक्षता जनजाग्रती सप्ताह आयोजित करण्यात येतो. यावर्षी 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कलावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन ‘इमानदारी- एक जीवनशैली’ ही संकल्पना घेऊन साजरी केली जात आहे.
0000000000000









औरंगाबाद विभागात एकता दौडची तयारी पूर्ण

औरंगाबाद दि. 30 (विमाका) - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शासकीय कार्यालय, शाळा यांच्या सहभागाने एकता दौड चे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण झाली आहे. हा दिवस देशभरात ‘ राष्ट्रीय एकता दिवस ’ म्हणून साजरा केला जातो.
राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 'रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात येते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये व तद्नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा व जनतेला त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी यादृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने मराठवाडा विभागातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजित दौडद्वारे एकतेचा संदेश देण्यात येणार आहे. या एकता दौडमध्ये क्रीडा संघटना, शासकीय कार्यालय,  शाळा,  महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत.
औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी अशा चारही जिल्ह्यात राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने एकतेचा संदेश देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने गुरुवार दि.31 ऑक्टोबर रोजी ‘एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे.
औरंगाबाद जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सकाळी  6.15 वा. राष्ट्रीय  एकता दौड स्थळ क्रांतीचौक ते बाबा पेट्रोल पंप पर्यंत आयोजित करण्यात आलेली असून या कार्यक्रमास सर्व अधिकारी व कर्मचारी यांना  या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीने  सकाळी ८.००  वा. शहरातील मम्मादेवी येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापासून ते शिवाजी पुतळा इथपर्यंत एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडच्या कार्यक्रमास  शासकीय, निमशासकीय,सहकारी संस्थेतील अधिकारी, कर्मचारी तसेच  जालनेकरांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड मार्फत सकाळी 8.00  वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा क्रीडा संकुल अशा " एकता दौड" ( रन फॉर युनिटी ) चे आयोजन करण्यात आले आहे.  
परभणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सकाळी 7.30 वा. राजगोपालाचारी उद्यान ते जिल्हा क्रिडा संकुल येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एकता दौड बरोबरच राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात येणार आहे.  अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी तसेच मान्यवर नागरीक यांनी या राष्ट्रीय एकता दौडीमध्ये सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने आवाहन केले आहे.
०००००


पदवीधर मतदारांनी लवकर नाव नोंदणी करावी
– विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर
 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ ‍निवडणूक



औरंगाबाद, दिनांक ३० (जिमाका) – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक कार्यक्रमाबाबत विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी राजकीय पक्षांशी आज संवाद साधला. तसेच सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी पदवीधर मतदार नोंदणी लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली.
विभागीय आयुक्त यांच्या दालनात श्री. केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपायुक्त ‍शिवाजी ‍ शिंदे, उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मतदार नोंदणी नियम १९६० अंतर्गत नियम ३१ (३) अन्वये महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी पात्र मतदारांची नोंदणी करावयाचा कार्यक्रम निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त यांनी ०१ ऑक्टोबरपासून जाहीर केलेला आहे. मतदार नोंदणीसाठी एक ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर या कालावधीत पात्र पदवी अहर्ता, पात्र तत्सम अर्हता व्यक्तींना नमुना नं.१८ मध्ये मतदार नोंदणीसाठी अर्ज करता येईल. अर्जाचा नमुना तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विनामुल्य उपलब्ध आहे. या नोंदणीसाठी एक नोव्हेंबर २०१९ या अर्हता दिनांकापूर्वी किमान तीन वर्ष अगोदर पात्र पदवी अर्हता अथवा तत्सम पात्र पदविका इ. धारण करणा-या व्यक्तींना अर्ज करता येणार आहे. नमुना १८ च्या अर्जासह मूळ कागदपत्रे अथवा राजपत्रित अधिका-याकडून सांक्षांकित केलेल्या सत्यप्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदार ज्या ठिकाणी अर्ज करेल त्या ठिकाणचा सामान्यत: रहिवासी असावा. अर्जासोबत पदवी परीक्षेची, पदविका परीक्षेचे अंतिम गुणपत्रक देखील ग्राह्य धरले जाईल. मात्र, गुणपत्रकान्वये सदर व्यक्ती पास किंवा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणित झाले असले पाहिजे. शासकीय कार्यालयात सामाजिक उपक्रमामध्ये काम करणा-या व्यक्तीच्या अर्हताबद्दल संस्थेकडील अभिलेख पाहून कार्यालय प्रमुखांना मतदार नोंदणीसाठी विहित नमुन्यात प्रमाणपत्र देता येईल. तसेच विद्यापीठांकडील पदवीधारकांची नोंदणी, अभियंत्यांची नोंदणी, विधी अभिकर्त्याची नोंदणी, वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणी , सनदी लेखापालांची नोंदणी आदी नोंदणीबाबतचा दाखला अर्जासोबत अर्हतेबाबत पुरावा म्हणून देता येईल. तसेच राजकीय पक्ष संघटना अथवा कोणत्याही व्यक्तीस एका गठ्ठा अर्ज मिळणार नाहीत, तसेच एक गठ्ठा पद्धतीने अर्ज स्वीकारलेही जाणार नाहीत. मात्र, एका कुटुंबासाठी अथवा कार्यालय प्रमुख अथवा संस्थेस त्यांच्या कार्यालयातील कर्मचा-यांसाठी अर्जाची एकत्रित मागणी करता येईल व एकत्रित अर्ज सादर करता येतील.
प्राप्त मतदारांची प्रारूप यादी २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येऊन २३ नोव्हेंबर ते नऊ डिसेंबरपर्यंत संबंधितांना दावे, हरकती नोंदविता येतील. दिनांक ३० डिसेंबर रोजी मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. ‍विभागातील सर्व शासकीय कार्यालये, सर्व विद्यापीठे यांनी पदवीधर मतदार नोंदणीला प्राधान्य द्यावे व अधिकाधिक पदवीधर मतदारांची नोंदणी करावी.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रशिक्षण
जिल्हाधिकारी कार्यालयात 31 ऑक्टोबर 2019 रोजी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात सकाळी अकरा वाजता हे प्रशिक्षण होणार आहे.
******