Friday 16 September 2016



मराठवाड्याच्या विकासाला राज्य सरकारचा अग्रक्रम
              -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            औरंगाबाद,दि. 17 :  मराठवाड्याच्या विकासाला चालना देण्याचा राज्य सरकारचा निर्धार असून त्यासाठी शेती, उद्योग आणि पायाभूत क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यासाठी सरकार कटिबध्द आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
            मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त आज येथे सिध्दार्थ उद्यानात आयोजित मुख्य कार्यक्रमात ध्वजारोहण केल्या नंतर मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठवाड्याचा विकास ही राज्य सरकारच्या दृष्टीने अग्रक्रम असलेली बाब आहे, असे सांगितले.
            आपल्या भाषणाच्या प्रारंभी मुक्ती संग्रामातील हुतात्मांना आदरांजली अर्पण करुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी हुतात्मांच्या त्यागाचा आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा गौरवपुर्ण उल्लेख केला. आजचा दिवस हुतात्मांचे कृतज्ञतापुर्वक स्मरण करण्याचा, स्वातंत्र्य सैनिकांचे अशिर्वाद घेण्याचा आणि विकासासाठी कटिबध्द होण्याचा आहे, असे नमुद करुन मुख्यमंत्री म्हणाले की, गेली काही वर्षे मराठवाड्याला दुष्काळाला समोरे जावे लागले. गेल्या वर्षीच्या दुष्काळाने अनेकांना 1972 च्या दुष्काळाची आठवण आली. या कठीण प्रसंगी राज्य शासन कर्तव्यभावनेने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. शेतकऱ्यांना सुमारे 4 हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली. पीक विमा योजनेच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना मदत दिली गेली. अशी मदत देणे हे सरकारचे कर्तव्य होते. एवढी मदत पुर्वी कधीही दिली गेली नव्हती.
            जलयुक्त शिवार योजनेत मराठवाडा विभागात सर्वाधिक लोकसहभाग लाभला असे सांगून मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल जनतेचे अभिनंदन केले. आपल्या भागातील दुष्काळावर आपण मात करु शकतो या जिद्दीने गावकऱ्यांनी काम केले. त्यामुळे  विभागातील  अकराशे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. यंदा चांगला पाऊस झाला असून त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेतील कामांची फलनिष्पती दिसून येईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
            मराठवाड्याला त्याचे हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, अशीच राज्य सरकारची भूमिका आहे. पहिल्या टप्पातील 7 टी.एम.सी. पाण्यासाठी शासन निधी देणार आहे. केंद्र सरकारने सिंचन प्रकल्पासाठी निधी देण्याचे ठरविले असून त्याचाही उपयोग मराठवाड्यातील प्रकल्पांना होणार आहे. मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वॉटर ग्रिड प्रकल्प राबविला जाईल, या संदर्भातील निर्णय  औरंगाबाद येथे मंत्रीमंडळ बैठकीत घेतला जाईल असे त्यांनी सुचित केले.
            मराठवाडा आणि विदर्भातील शेतीसाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने एकात्मिक प्रकल्प राबविला जाणार असून सुमारे 4 हजार कोटी खर्चाच्या या प्रकल्पातून 5 हजार गावांतील शेतीचे चित्र बदलून जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
            उद्योग क्षेत्राचा उल्लेख करुन मुख्यमंत्र्यांनी डीएमआयसी प्रकल्पाला गती मिळाली असल्याचे सांगितले. या प्रकल्पात शेंद्रा-बीडकिन भागात सध्या जे काम होत आहे, त्या कामामुळे हा प्रकल्प पुढे नेणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख होत आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पातील गुंतवणूकीसाठी सामंज्यस्य करार होत असल्याचे सांगितले. मराठवाडा विभागातील उद्योगांना वीज दरात वार्षीक 500 कोटी रुपयांची सबसिडी देण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
            नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाचा उल्लेख करुन मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना विस्थापन नव्हे तर सहभाग देणारे प्रारुप स्विकारले आहे, त्याचा त्यांना मोठा लाभ होईल. मराठवाड्यातील कोणतेही शहरातून शेतमालाची आणि अन्य उत्पादनाची बाजारपेठेपर्यंत वाहतूक जलदगतीने करणे शक्य होईल. विभागातील पर्यटनालाही चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस आणि अन्य मान्यवरांनी हुतात्मा स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले.  यावेळी पोलीस दलातील जवानांनी हवेत तीन फैरी झाडून मानवंदना दिली. ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेतली.
या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार रावसाहेब दानवे, आमदार संजय सिरसाट, आ. अतुल सावे, आ. अब्दुल सत्तार, आ. प्रशांत बंब, आ. नारायण कुचे, महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष एम.एम. शेख, भिकूजी इदाते यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी, विविध स्वातंत्र्यसैनिक, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक अजित पाटील, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी  मधुकर आर्दड, महापालिका आयुक्त ओमप्रकाश बोकोरिया, जिल्हा पोलीस अधिक्षक नवीनचंद्र रेड्डी, आदी  उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम लढयाचे चित्र मांडणाऱ्या स्मृती संग्रालयाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.