Wednesday 30 October 2019

औरंगाबाद विभागात एकता दौडची तयारी पूर्ण

औरंगाबाद दि. 30 (विमाका) - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शासकीय कार्यालय, शाळा यांच्या सहभागाने एकता दौड चे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण झाली आहे. हा दिवस देशभरात ‘ राष्ट्रीय एकता दिवस ’ म्हणून साजरा केला जातो.
राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 'रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात येते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये व तद्नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा व जनतेला त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी यादृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने मराठवाडा विभागातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजित दौडद्वारे एकतेचा संदेश देण्यात येणार आहे. या एकता दौडमध्ये क्रीडा संघटना, शासकीय कार्यालय,  शाळा,  महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत.
औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी अशा चारही जिल्ह्यात राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने एकतेचा संदेश देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने गुरुवार दि.31 ऑक्टोबर रोजी ‘एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे.
औरंगाबाद जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सकाळी  6.15 वा. राष्ट्रीय  एकता दौड स्थळ क्रांतीचौक ते बाबा पेट्रोल पंप पर्यंत आयोजित करण्यात आलेली असून या कार्यक्रमास सर्व अधिकारी व कर्मचारी यांना  या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीने  सकाळी ८.००  वा. शहरातील मम्मादेवी येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापासून ते शिवाजी पुतळा इथपर्यंत एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडच्या कार्यक्रमास  शासकीय, निमशासकीय,सहकारी संस्थेतील अधिकारी, कर्मचारी तसेच  जालनेकरांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड मार्फत सकाळी 8.00  वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा क्रीडा संकुल अशा " एकता दौड" ( रन फॉर युनिटी ) चे आयोजन करण्यात आले आहे.  
परभणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सकाळी 7.30 वा. राजगोपालाचारी उद्यान ते जिल्हा क्रिडा संकुल येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एकता दौड बरोबरच राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात येणार आहे.  अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी तसेच मान्यवर नागरीक यांनी या राष्ट्रीय एकता दौडीमध्ये सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने आवाहन केले आहे.
०००००


No comments:

Post a Comment