Friday 6 September 2019


पुस्तकांच्या गावात 30 हजार पुस्तक;
दीड लाख वाचक प्रेमींची भेट!

मुंबई, दि. 6: भारतातील पहिले 'पुस्तकांचे गाव' अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील  भिलार या पुस्तकांच्या गावात गेल्या दोन वर्षात दीड लाखांहून अधिक वाचक पर्यटकांनी भेट दिली आहे. या गावात वाचक पर्यटकांसाठी 30 हजारहून अधिक पुस्तकांचा खजिना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी सुरु करण्यात आलेला'पुस्तकांचे गाव' हा उपक्रम आता नियमित योजना स्वरुपात रुपांतरित करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. त्यामुळे वाचक-पर्यटकांना याठिकाणी आणखी सुविधा उपलब्ध होतील.
भिलार येथे 4 मे 2017 पासून 'पुस्तकांचे गाव' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत या गावात 13 साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या ठिकाणी वाचकांसाठी दर्जेदार इंग्रजी पुस्तकेही उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. गेल्या २ वर्षांत गावकऱ्यांच्या आग्रहामुळे एकूण १० पुस्तक घरांचा या प्रकल्पात नव्याने समावेश करण्यात आला आहे.
शासनाचा पुढाकार आणि लोकसहभाग याचे ‘पुस्तकाचे गाव’ हेउत्कृष्ट उदाहरण आहे. पुस्तके ठेवण्यासाठीची जागा घरमालक, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन यांच्याकडून विनामोबदला देण्यात आली आहे. गावातील राहती घरे, निवारागृहे, शाळा व मंदिरे अशा 35 ठिकाणी विविध साहित्यप्रकारांची पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
इंग्लडमधील 'हे ऑन वे'च्या धर्तीवर भारतातील हे पहिले पुस्तकांचे गाव विकसित करण्यात आले आहे. या गावात येणारे पर्यटक कोणतेही पुस्तक विनामूल्य वाचू शकतात.
००००