Friday 22 November 2019

केंद्रीय पथकाव्दारे पिक नुकसानीची पाहणी

औरंगाबाद, दि.22 (जिमाका) –राज्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या पावसाने खरीप हंगामातील पिक हातचे गेले. त्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने केले आहेत. त्याबाबत प्रत्यक्ष पाहणी करुन केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यासाठी केंद्रीय कृषी विभागाच्या पाहणी पथकाव्दारे आज 22 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील फुलंब्री, सिल्लोड आणि कन्नड या तालुक्यातील गावांमधील पीक परिस्थितीची पाहणी करण्यात आली.यावेळी पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचा आढावा घेतला.

या पाहणी पथकाचे प्रमुख केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव डॉ. वी. तिरुपगल व त्यांच्यासोबत डॉ. के मनोहरण, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, जिल्हा कृषी अधिक्षक तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे(फुलंब्री) , ब्रिजेश पाटील (सिल्लोड), जनार्दन विधाते (कन्नड) यांच्यासह इतर संबधिंत अधिकारी पाहणी दौऱ्यात उपस्थित होते.

यावेळी फुलंब्री तालुक्यातील चौका येथून नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीस पथकाने सुरवात केली. येथील कांचनबाई नाना वाघ यांच्या दिड एकर शेतातील मका पिकाचे पूर्णत: नुकसान झालेले असून पथक प्रमुखांनी त्या शेतात अजूनही साचून असलेले पाणी, अवकाळी पावसामुळे काढता न आलेला मका याची पाहणी केली. श्रीमती कांचन वाघ यांच्याशी संवाद साधून पथकाने त्यांच्या समस्या , झालेले एकंदरीत नुकसान याबाबत माहिती जाणून घेतली. पुढे पाल गावातील पिकाची पाहणी करुन झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. या गावातील कृष्णा जाधव या शेतकऱ्याने सांगितले की, अवकाळी पावसामुळे एका एकरातील उभे पिक हातचे गेले असून ज्या कपाशीला 50 रु कि. भाव मिळतो तिथे आज नाईलाजाने आम्हाला 10 ते 15 रुपये किलो भावात विकावी लागत आहे. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांवर मोठी आर्थिक अडचण कोसळली आहे,अशा भावना यावेळी शेतकरी जाधव यांनी व्यक्त केल्या. पाथ्री येथील मंदाकीनी पाथ्रीकर यांच्यासह या भागातील शेतीतील कपाशी पिकाचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे यावेळी पथक पाहणीत दिसून आले.

पथकाने सिल्लोड तालुक्याचीही पाहणी केली. तालुक्यातील गेवराई शेमी येथील कडुबा ताठे, माणिकराव ताठे, साहेबराव ताठे, मुरलीधर कापडे, या शेतकऱ्यांशी संवाद साधून पथकाने त्यांचे म्हणणे जाणून घेतले. निल्लोड येथील पांडुरंग आहेर यांच्या मका, सोयाबीन, कापूस,पिकांचे अवेळीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. वंजोळा गावातील विष्णू पंडित या शेतकऱ्याच्या सहा एकर शेतातील मका, कापूस ही दोन्ही पिके शंभर टक्के वाया गेली. मका दुबार पेराही रोग पडल्याने खराब झाल्याचे श्री. पंडित यांनी यावेळी सांगितले. धानोरा गावातील सुभाष बमनावत यांच्या दिड एकरातील दोन लाख खर्च करुन लागवड केलेल्या अद्रक पिकावर रोग पडल्याने संपूर्ण अद्रकीचे पिक खराब झाले असून संपूर्ण गावात हीच परिस्थिती आहे. भराडी गावातील शिवाजी खोमणे या शेतकऱ्याने सांगितले की, 22 दिवस सतत पाऊस झाल्याने दोन एकरातील मका पूर्णत: पाण्यात भिजून खराब झाली ,सडली आणि जनावराने ती खाल्याने ती मृत झाल्याचे यावेळी शेतकऱ्याने सांगितले. या पाहणी दौऱ्यात पुढे पुढे कन्नड तालुक्यातील आडगाव पिशोर येथील गेनुबाई भिवान भोसले यांच्या बत्तीस गुंठे शेतात मका आणि कपाशी होती पण एक महिन्यापासून पाणी साचले आहे. पाणी आटण्यासाठी अजून एक महिना लागणार आहे. शेतातील पूर्ण पिक हातचे गेले असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. नाचनवेल येथील राधाबाई राजपूत यांनी आपल्या दोन एकर शेतातील कापूस पूर्ण वाया गेला असून किमान बि-बियाणांचा आणि खताचा खर्च सरकारने द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तर नाचनवेल शिवारातील कोपरवेल येथील शिवाजी धुमाळ यांनी आपल्या एक एकर मक्याचे पूर्ण नुकसान झाले असून दहा दिवस पाऊस होता आता आम्ही काय करावं, काही सुचत नाही, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

पाहणी दौऱ्यापुर्वी आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी पथकासमोर विभागातील नुकसानीचे सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली.