Sunday 3 November 2019

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शासन पाठीशी - पालकमंत्री एकनाथ शिंदे


नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शासन पाठीशी - पालकमंत्री एकनाथ शिंदे
प्रशासनाच्या संवेदनशिलतेचे उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक
औरंगाबाद, दिनांक 3 (जिमाका) – संपूर्ण मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे खरीप पीकांचे संपुर्णत: नुकसान झाले असून खराब झालेले पीक जनावरांना चारा म्हणूनही उपयोगाचे राहीले नाही. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वोतापरी मदत करणार असुन शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासित केले. नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावरून परतल्यानंतर ते बोलत होते.
अतिवृष्टीमुळे संपूर्ण मराठवाड्यात खरीप पीकांचे नुकसान झाल्याबाबतची आढावा बैठक सुभेदारी विश्रामगृह येथे आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षिरसागर, खासदार अनिल देसाई, व जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, उपायुक्त पराग सोमण आणि महसुल विभागातील संबंधित अधिकारी यांची उपस्थिती होती.

प्रशासनाच्या संवेदनशिलतेचे उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक
यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाच्या अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून पंचनामे व इतर मदत करण्याच्या प्रशासनाच्या तत्परतेबाबत कौतुक केले. तसेच शेतकऱ्यांच्या भावनांबाबत संवेदनशीलता दाखविल्याबाबत प्रशासनाचे धन्यवाद दिले. तसेच शासन आणि प्रशासन मिळून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहु, तसेच स्थानिक पातळीवर प्रशासनाशी आमचे कार्यकर्ते आवश्यक तिथे समन्वयाने कार्य करतील असे पक्ष प्रमुख म्हणुन आपण
येथे सांगत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी श्री. केंद्रेकर यांनी विभागात अवेळी पावसामुळे एकुण 421 महसूल मंडळांपैकी 141 मंडळात 65 मि.मि. पेक्षा जास्त पाऊस झाल्याचे व काही मंडळात अतिवृष्टी नसतांना काढणीसाठी तयार झालेली पीके यामध्ये मका, बाजरी, सोयाबीन, कापूस, ज्वारी अवेळी पावसामुळे खराब झाल्याने जनावरांनाही खाण्यालायक नसल्याने प्रत्यक्ष पाहणीव्दारे स्पष्ट झाल्याची माहिती दिली. त्याचबरोबर सर्व जिल्हाधिकाऱ्यांनाही शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा प्रत्यक्ष गावात जाऊन करण्याच्या सूचना केल्या आहेत. 20 टक्के बाधीत क्षेत्राचे पंचनामे पुर्ण करण्यात आले आहेत. तसेच सन 2019 पिक विमा योजनेअंतर्गत नुकसानी संबंधित 716041 इतके अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती दिली. पीकविमा असो किंवा नसो सरसकट सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या व त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याचेही श्री. केंद्रेकर यांनी यावेळी  सांगितले.


कानडगाव, गारजमध्ये पीक नुकसानीची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी


कानडगाव, गारजमध्ये पीक नुकसानीची
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी
रोहयो मंत्री क्षीरसागर,खोतकर यांचीही उपस्थिती
औरंगाबाद, दिनांक 3 (जिमाका) - कन्नड तालुक्यातील कानडगाव,   वैजापूर तालुक्यातील गारजमध्ये गावातील शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, आमदार संदिपान भुमरे, आमदार उदयसिंह राजपूत, आमदार रमेश बोरणारे, आमदार अब्दुल सत्तार, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदी उपस्थित होते.
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या सर्व पिकांचे नुकसान झाले. शासनाने पिकांची नुकसान भरपाई त्वरित द्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी यावेळी श्री. शिंदे यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केली. कानडगाव येथे मोगल कुटुंबीय व गारज येथे लालचंद राजपूत यांच्या शेतात श्री. उद्धव ठाकरे यांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधला, तसेच परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांना धीर दिला. या परिसरातील शेतकरी काशीनाथ जाधव, अशोक गाडेकर, प्रभाकर जाधव यांनी शासनाने आम्हाला लवकर मदत द्यावी, अशी मागणी केली.