Friday 23 September 2016



वृक्ष लागवड कार्यक्रमात लोकसहभाग वाढला पाहिजे
                                                 -वनमंत्री, सुधीर मुनगंटीवार

        औरंगाबाद, दि. 23: विमाका : राज्यात आगामी काळात 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात लोकसहभाग महत्वाचा असून  लोकसहभाग वाढवण्यासाठी वन व सामाजिक वनीकरण विभागाने प्रयत्न प्रयत्न करावेत. तसेच लोकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा. अशी अपेक्षा राज्याचे वित्त व नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार व्यक्त केले. येथील विभागीय आयुक्त कार्यालयात वन विभागातर्फे आयोजित पाचवी वरिष्ठ वन अधिकारी परिषदेत ते बोलत होते.
            कार्यक्रमाला वन विभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वन संरक्षक सर्जन भगत,  विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, वन विभागाचे महासंचालक ए.आर.चड्डा, ब्रिगेडियर श्री. चौव्हाण, कर्नल नवीन शर्मा , कर्नल श्री. शर्मा, राज्यातील वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.
            श्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, वन विभाग हा सर्वश्रेष्ठ विभाग असून शक्तीशाली विभाग आहे. मनुष्याच्या जीवनात वनांचे महत्व खुप असून हा विभाग समाजाचे प्रतिनिधीत्व करतो. आगामी काळात
 50 कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन केले असून  हे काम राज्यभरात यशस्वीपणे सुरु आहे. याची दखल लिमका बुकने घेतली आहे.वृक्ष लागवड  कार्यक्रमासाठी   राज्यातील 1 कोटी लोकांना वनदूत म्हणून नेमले जाणार असून त्यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचे महत्व जनतेला सांगितले जाईल. असे ते म्हणाले.
            राज्यातील मुख्य वन संरक्षक कार्यालये आय.एस. ओ दर्जाचे  करणार आहोत. वन विभागतंर्गत येणाऱ्या सर्व कामांचे सुक्ष्म नियोजन करुन गुणवत्तापुर्वक कामे करत कामांच्या वेगावर वन अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करावे. वन विभागातर्फे केल्या जाणाऱ्या चांगल्या कामाची माहिती जनतेला व्हावी यासाठी वृत्तपत्रात, यशोगाथा, लेख, बातम्या लिहून सर्व प्रसार माध्यमांना प्रसिध्दीसाठी  दयाव्यात. वन विभागातील सर्व कामांना गती येण्यासाठी शासनाने  99 कलमी कार्यक्रम तयार केले असून या अंतर्गत वन विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम  करुन हा कार्यक्रम यशस्वी करावा. असे त्यांनी यावेळी सांगितले.      
या परिषदेमध्ये  सेनेच्या इको- टास्क फोर्सने आता पर्यंत केलेल्या वृक्ष लागवडीच्या कामाबाबात भारतीय प्रादेशिक सेनेचे ब्रिगेडियर श्री. चौव्हाण यांनी माहितीचे सादरीकरण केले. प्रादेशिक सेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या परिषदेत विशेष आमंत्रित करण्यात आले होते.
            कार्यक्रमाच्या सुरुवातीला वन मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते  झाडाला पाणी देवून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्याच्या हस्ते भारतीय वनसेवेला 50 वर्ष पुर्ण झाल्या निमित्ताने भित्ती पत्रकाचे, पाटणादेवी गौताळा पक्षी अभयरण्य याची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना पुस्तिका, मानव-सर्प संघर्ष हाताळण्यासाठी प्रमाणभूत प्रचलित कार्यपध्दती पुस्तिका तसेच 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमतंर्गत प्रजातीची निवड व रोप निर्मिती मार्गदर्शका, नवेगाव-नागझरी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अधिसुचना पुस्तिकेचे विमोचन यावेळी करण्यात आले. दोन दिवस चालण्याऱ्या या परिषदेत वन विभागातंर्गत येणाऱ्या विविध विषयावर तसेच कामकाजाच्या नियोजनाबाबत चर्चा होणार आहे.