Thursday 25 July 2019

खुल्या प्रवर्गातील गुणवंतांसाठीच्या
उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनेस मुदतवाढ

औरंगाबाद, दिनांक 25  – खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना 2018-19 पासून परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना शासनाने सुरू केली आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20 करीता या योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर अर्ज विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण औरंगाबाद विभाग, औरंगाबाद येथे सादर करण्या31 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. दि. ३१ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्जदारांना अर्ज सादर करता येतील, असे उच्च शिक्षण ‍विभागाच्या सहसंचालक यांनी कळविले आहे.
राज्यातील खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी पदव्युत्तर, पदविका, पी.एच.डी अभ्यासक्रमांसाठी किंवा रँकिंग 200 च्या आतील असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल अथवा प्रवेश घेतील अशा 20 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्याबाबतची योजना शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून सुरू करण्यात आली. उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या कला, वाणिज्य, विज्ञान व विधी अभ्यासक्रमांना प्रत्येकी दोन संच मंजूर आहेत.
****

तरुणांसाठी औरंगाबादमध्ये
ऊरी द सर्जिकल स्ट्राईक चित्रपट दाखवणार

औरंगाबाद, दि. 25 : जिल्हा सैनिक कार्यालयच्या वतीने २६ जुलै २०१९ रोजी कारगिल विजय दिवस औरंगाबाद जिल्ह्यात ऊरी द सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट १८ ते २५ वयोगटातील युवक-युवतींसाठी मोफत दाखवून साजरा करण्यात येणार आहे. चित्रपटाची वेळ सकाळी १० वा. आहे.
शहरातील अंजली बिग सिनेमा गृह, मुक्ता नुपूर, प्रोझोन आयनॉक्स, अभिनय, अभिनित, रिलायंस आयनॉक्स, अप्सरा, मोहन, वैजापूर येथील  स्वस्तिक सिनेमागृहात दाखविण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे. अंजलीमध्ये (२९०) (एकूण दर्शक), मुक्ता नुपूर (२७०), प्रोझोन आयनॉक्स (२००), अभिनय (६१७), अभिनित (२२९), रिलायंस आयनॉक्स (३२०), अप्सरा (३२२), मोहन (१६९), वैजापूर येथील स्वस्तिक (४९०) प्रेक्षक उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी
२९ जुलै पर्यंत मुदतवाढ

औरंगाबाद, दिनांक २५  – शासनाने खरीप हंगाम २०१९ मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्यासाठी अंतिम मुदत २४ जुलै होती. तथापि २४ जुलैच्या शासन निर्णयानुसार खरीप हंगाम २०१९ करिता योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्यास २९ जुलै पर्यंत मुदत वाढविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.
योजनेत सहभागी  होण्यासाठी बँक व ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (डिजिटल सेवा केंद्र) यांच्या मार्फत बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. तरी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यास्तव विहित मुदतीपूर्वी नजीकच्या बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा.
अधिक माहितीसाठी तत्काळ नजीकच्या कृषी सह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उप विभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँक, ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (डिजिटल सेवा केंद्र) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.
****