Monday 15 August 2016



राष्ट्रध्वजाचा व राज्यघटनेचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य
                                               पालकमंत्री- रामदास कदम

 औरंगाबाद, दि. 15 :  देशाच्या स्वातंत्र्यसाठी  अनेकांनी बलीदान दिले आहे.  देशाचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून राष्ट्रध्वजाचा व राज्यघटनेचा सन्मान करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. सर्वांगिण विकासाबरोबर शातंता व सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री रामदास कदम यांनी आज येथे केले.
स्वातंत्र्यदिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांशी संवाद साधतांना पालकमंत्री कदम यांनी स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही,  त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. अनेकांना बलिदान द्यावे लागले, याची आठवण करुन देऊन     देशाच्या राज्यघटनेने सर्वांना अधिकार दिलेले आहेत. सर्वांनी या राज्यघटनेनुसार वागले पाहिजे. जात,धर्म, पंथ बाजूला ठेवून आपण सारे एक आहोत या भावनेने काम केले पाहिजे, असे सांगितले. यावेळी  त्यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय घेतले आहेत, असे नमूद करुन त्यांनी ‘जलयुक्त शिवार’ योजना यशस्वी झाल्याचे सांगितले. जायकवाडी धरणही  पावसाळा संपेपर्यंत शंभर टक्के भरेल असा विश्वास त्यांनी  व्यक्त केला. त्यामुळे शेतीत सोने पिकेल असे ते म्हणाले. स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पालकमंत्री कदम यांच्या हस्ते  पोलीस निरिक्षक रामेश्वर थोरात यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले. तसेच पोलीस आयुक्त कार्यालयातील, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल, सोशल मिडीयाचे  पोलीस निरीक्षक मधुकर सांवत, ज्ञानेश्वर साबळे, गजानन कल्याणकर यांना संबंधित शाखांचे आय.एस.ओ. 9001-2015  प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
 
प्राथमिक व माध्यमिक शिष्यवत्ती आणि राष्ट्रीय प्रज्ञा शोध परिक्षेत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा यावेळी गौरव करण्यात आला. त्यात मयांक भगत,  शार्दुल अनसिंगकर, श्रावणी  कुलकर्णी, महेश काळे, यश काला   यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाला विविध स्वातंत्र्यसैनिक तसेच खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, आ. इम्तीयाज जलील, महापौर त्र्यंबक तुपे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, मनपाचे आयुक्त ओमप्रकाश बोकारिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलीस महानिरिक्षक अजित पाटील, पोलीस अधिक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी, कर्मचारी  व नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रविणा कन्नडकर यांनी केले.