Friday 18 November 2016



महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शनाला शाळकरी
विद्यार्थ्यांची पसंती
       औरंगाबाद,दि.18(जिमाअ)---माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागामार्फत भरविण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या चित्रणाचे निरीक्षण करुन पसंती दर्शवली.
          खोकडपुरा येथील सामाजिक न्याय भवनातील सभागृहात दि. 19 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10 ते 6 यावेळेत भरविण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाची पाहणी करण्यासाठी शहरातील विविध शाळांची मुले-मुली येत आहेत. प्रदर्शनातून महाराष्ट्रीयन संस्कृतीची ओळख प्रत्यक्ष छायाचित्राच्या माध्यमातून होते आहे, असे प्रत्येक विद्यार्थी येथील प्रदर्शन पहायलयास म्हणतो आहे.
          आज दि. 18 रोजी हर्सुल परिसरातील यशदा पब्लिक स्कूलच्या 5 वी ते 8 वीतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत शिक्षक आर.एन. सहाणे, आर.एस. काथार, श्रीमती एस. आर. डकले होत्या. त्यांनीही विद्यार्थ्यांना छायाचित्रातील बारकावे, संस्कृती, प्राचीन वारसा, अजिंठा लेणी, बीबी का मकबरा आदी विविध छायाचित्रातील  पैलू समजून सांगितले. महाराष्ट्र राज्याची प्रगती या जिवंत छायाचित्रातून दिसते आहे. विविध परंपरांची जपणूक, त्यांची सुयोग्य मांडणी अत्यंत मेहनतीने मांडण्यात आली असल्याचेही, त्यांनी यावेळी शाळेच्यावतीने सांगितले.
          आ.कृ. वाघमारे प्रशालेतील विद्यार्थ्यांनीही यावेळी प्रदर्शनाची पाहणी केली. शाळेचे शिक्षक डी. एस. सोनवणे यांनी या उपक्रमाचे कौतूक करुन छायाचित्रांची आवड असणाऱ्यांसाठीही मोठी पर्वणीच असल्याचे यावेळी सांगितले. तसेच शिक्षक एस. पी. राऊत म्हणाले, स्तुत्य व छान असा हा उपक्रम असून संपूर्ण महाराष्ट्राचे दर्शन एकाच ठिकाणी पहावयास मिळते आहे, असे म्हणाले.
          या शाळांसह शिवाजी हायस्कूलचे एस. पी. ढवळे, शिक्षक एम. एस. घोरपडे, आर. एस. चिंचोले आदींनीही विद्यार्थ्यांसह प्रदर्शनाची पाहणी केली.