Thursday 10 November 2016

महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शन औरंगाबादकरांसाठी पर्वणीच - रितेश कुमार





महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शन औरंगाबादकरांसाठी पर्वणीच
- रितेश कुमार 
औरंगाबाद,दि.10(जिमाका)----प्राचीन भारतीय कला - संस्कृती, इतिहासाचा वारसा, लोकपरंपरा, धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन, वन्यजीव आदी वैविध्यपूर्ण व जागतिक दर्जाचे छायाचित्र असलेले प्रदर्शन निश्चितच औरंगाबादकरांसाठी पर्वणीच आहे. शासनाच्या स्तुत्य अशा या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे मत औरंगाबादचे प्रभारी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आज येथे व्यक्त केले. 
खोकडपुरा येथील सामाजिक न्याय भवनात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाच्यावतीने आयोजित महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन रितेश कुमार यांच्याहस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे प्र. संचालक यशवंत भंडारे, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त पी. बी. बच्छाव, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त जलील शेख, जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे, सहाय्यक संचालक रवींद्र ठाकूर व पोलिस, माहिती विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि नागरिकांची उपस्थिती होती.
राज्यातील कानाकोपऱ्यातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन एकाच छताखाली या प्रदर्शनाच्या माध्यमातून पहावयास मिळत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील लोकजीवन, प्राचीन वारसा, गगनचुंबी इमारती, भातलावणी, भातमळणी, नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळा, बौद्ध संस्कृतीची ओळख, महाराष्ट्राचा ताजमहल अर्थात औरंगाबादचा बीबी का मकबरा, गडकिल्ले आदी छायाचित्रे मनाला आकर्षित करुन घेणारी आहेत. वैविध्यपूर्णरित्या, मेहनतीने, कल्पकतेने छायाचित्रकारांनी काढलेली ही छायाचित्रे कौतुकास पात्र आहेत. यामध्ये शासनाने सातत्याने महाविद्यालयीन तरुणांचा, हौशी छायाचित्रकार यांना सहभागी करुन घ्यावे, असे रितेश कुमार यांनी यावेळी सांगितले. 
प्र. संचालक यशवंत भंडारे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने राज्यभरात छायाचित्रकारांसाठी महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी राज्यातील नामवंत अशा छायाचित्रकारांनी सहभाग घेतला. राज्यातून 3800 छायाचित्रे या स्पर्धेत सहभागी झाली होती. त्यातील निवडक व उत्कृष्ट अशा 550 छायाचित्रांचा समावेश या छायाचित्र प्रदर्शनात करण्यात आला आहे, असे सांगून महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शन उपक्रमाचा उद्देश रितेश कुमार यांना सांगितला. 
मुंबईनंतर प्रथमच मराठवाडा विभागाला छायाचित्र प्रदर्शनाची संधी मिळाली असून प्रदर्शन दि. 19 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10 ते 6 या वेळेत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रारंभी रितेश कुमार यांच्याहस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर श्री. भंडारे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व प्रदर्शनाबाबत सविस्तर माहिती दिली.
चांदा ते बांधा एकाच छताखाली
महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धेत राज्यभरातील नामवंत छायाचित्रकारांनी भाग घेतला. त्यांचे छायाचित्र पाहण्याची संधी खोकडपुरा येथील सामाजिक न्याय भवनात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने दि. 19 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10 ते 6 या वेळेत विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या छायाचित्र प्रदर्शनात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विविध संस्कृती, वन्यजीव, गडकिल्ले, वृक्षसंवर्धन आदी विषयांवरील छायाचित्रे मनाला मोहून टाकणारी आहेत. 
प्रदर्शनातील छायाचित्रांमध्ये औरंगाबाद येथील छायाचित्रकार जॉन चार्लस यांचे वृक्षसंवर्धनावरील, फिरोज खान यांचे सुर्यास्तातील मकबरा, नांदेड येथील विजय होकर्णे यांचे महाराष्ट्राचा प्राचीन वारसा, देवदत्त कशाळीकर यांचे राज्य स्वराज्याचे सर्वधर्म समभावाचे, महेंद्र गजभिये यांचे इतिहासाचा अमुल्य ठेवा अजिंठा, संकेत कुलकर्णी यांचे प्राचीन कलाकृती आणि आपली संस्कृती, राकेश वाटेकर यांचे लोकपरंपरेचा मारबत उत्सव, शरद पाटील, सुनील क्वळे यांचे भक्तीचे प्रांगण, डॉ. सुधाकर किराडे यांचे वास्तुशास्त्राचा नमुना, नितीन सोनवणे यांचे वाघसंवर्धन, प्रशांत खरोटे व प्रदीप सुतार यांचे कासपठारावरील सुंदर छायाचित्रे उत्कृष्ट आहेत. त्याचबरोबर राज्यातील विद्याधर राणे, दिनेश भडसाळे, सचिन मोहिते, अशोक पाटील, चंद्रकांत पाटील, सतीश काळे, सुमीत अहिरे, आदित्य येवले, उमेश मोहोळकर, अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या या नामवंत छायाचित्रकारांसह अन्य नामवंत छायाचित्रकारांनी कल्पकतेने काढलेली छायाचित्रे या प्रदर्शनात पहावयास मिळतात.
*******