Saturday 2 November 2019

शेतकऱ्यांच्या हितालाच सर्वोच्च प्राधान्य - पालकमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांच्या हितालाच सर्वोच्च प्राधान्य- पालकमंत्री एकनाथ शिंदे
  पालकमंत्र्यांनी केली शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी
औरंगाबाद, दिनांक 2(जिमाका)परतीच्या  पावसाने  शेतकऱ्यांच्या  पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.  प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंगापूर, कन्नड आणि खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.शासन शेतकऱ्यांच्या हितालाच प्राधान्य देईल असेही ते म्हणाले.
गंगापूर तालुक्यातील सिध्दनाथ वडगाव येथे दिलीप बैनाडे, संजय बैनाडे यांच्या मका आणि कापूस पिकांच्या नुकसानीची त्यांच्या शेताच्याबांधावर जाऊन श्री. शिंदे यांनी पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक विमा कंपनी, कृषी विभाग यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकरी निहाय नुकसान भरपाई देण्यात यावी, यासाठी शासन सकारात्मक आहे. नुकसान भरपाई ही प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे. मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, अशी ग्वाही देखील श्री. शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली.
                सिध्दनाथ वडगाव येथे बैनाडे बंधुंच्या बांधावर खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरनारे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोनगावकर, माजी खासदार चंद्रकांत दानवे आदींची उपस्थिती होती.
पळसवाडीत पाहणी
खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथे देविदास देवरे यांच्या शेतात झालेल्या मका पिकाच्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री श्री. शिंदे यांनी केली. पाहणी दरम्यान येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकरी हा देशाचा कणा आहे. शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले. परंतु शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन तुमच्या खंबीरपणे पाठिशी असल्याचे यावेळी शेतकऱ्यांना सांगितले. तसेच शेतकऱ्याच्या हितासाठी आवश्यक ते सर्व काही करू, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांचे सोबत खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोनगावकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदींची उपस्थिती होती.
करंजखेड्यात शेतकऱ्यांना दिलासा
कन्नड तालुक्यातील करंजखेडा येथे विठ्ठल सोळंके, सुधाकर ताजने यांच्यासह येथील अन्य शेतकऱ्यांशी त्यांच्या शेताच्या बांधावर पालकमंत्री श्री. शिंदे यांनी संवाद साधला.परतीच्या पावसाने झालेले शेतकऱ्यांचे नुकसान शेतकऱ्यावरील संकट आहे. ते दूर करण्यासाठी शासन त्यांच्या खंबीरपणे पाठिशी उभे असल्याचा विश्वास शेतकऱ्यांना पालकमंत्री श्री. शिंदे यांनी दिला. तसेच प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांचे वेळेत पंचनामे करावेत,अशा सूचनाही केल्या.यावेळी त्यांच्या समवेत खासदार अनिल देसाई,  कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते.
भराडीला भेट
सिल्लोड तालुक्यातील भराडी येथेही पालकमंत्री शिंदे यांनी  बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी खा. अनिल देसाई आमदार अब्दुल सत्तार,जिल्हापरिषद् अध्यक्ष देवयानी डोणगावकर,माजी खासदार चंद्रकांत खैरे,बाबूलाल राजपूत अणि इतर उपस्थित होते .
.