Friday 26 August 2016



 जलयुक्त शिवार अभियानाची कामे वेळेत पूर्ण करुन
गावे पाणी टंचाई मुक्त करा.
                                             जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे
            औरंगाबाद, दि. 26- जलयुक्त शिवार अभियानाची कामे सर्व ठिकाणी लोक सहभागातून यशस्वी होत असून यावर्षीची नियोजित कामे वेळेत पूर्ण करुन गावे पाणी टंचाई मुक्त व्हावीत यासाठी सर्वानी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंधारण, राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित जलयुक्त शिवार अभियानाबाबत  विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते.
            यावेळी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, परिवहन मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते, विभागातील  जिल्हा परिषदेंचे अध्यक्ष, विभागातील लोकप्रतिनिधी, जलसंधारण व रोहयो सचिव डॉ. पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, मृद संधारण व पाणलोट क्षेत्र विभागाचे संचालक डॉ. सु.ल.जाधव, जलसंधारण विभागाचे अधिक्षक अभियंता वि.बा.नाथ, कृषी विभागाचे विभागीय सह संचालक श्री. भताणे, विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी, जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            श्री. शिंदे पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानात जुन्या योजना पुर्नजिवित करुन त्या माध्यमातून पाणी आडविले जावे त्यामुळे शेतीसाठी पाणी मिळू शकेल. या संदर्भातील नवीन प्रकल्पाबाबत विभागस्तरावर लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी  बैठक आयोजित करुन बैठकीमध्ये नवीन प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी तपासून त्याबाबत विचारविनिमय करुन प्रस्ताव शासनास सादर करावा. त्याबाबत धोरनात्मक निर्णय घेतला जाईल. आगामी निवडणुक आचारसहिंता लागण्यापूर्वी या अभियानाच्या कामाचा निवीदा प्रक्रिया पूर्ण करुन दुसऱ्या टप्पातील कामे सुरु करावी. स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली कामाचे नियोजन करुन कामे वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. अशा सुचना यावेळी त्यांनी संबंधिताना दिल्या.
            जलसंधारण विभागातील रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्यात येतील. तसेच या अभियानासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. या विभागाची पुर्नबांधणी करण्याचा प्रस्ताव शासनाचा विचाराधीन असून यासाठी स्वतंत्र्य आयुक्तालय निर्माणकरुन त्याचे मुख्यालय औरंगाबाद येथे करण्यात येईल. जलयुक्त शिवार अभियानातील कामे लवकर पूर्ण होण्यासाठी सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याबाबत सुध्दा शासनस्तरावर विचार सुरु आहे. असे त्यांनी सांगितले.
            विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे सुरुवातीला आपल्या मनोगतात म्हणाले, जलयक्त शिवार अभियानामध्ये सुरु असलेली कामे लवकरात लवकर पुर्ण करुन शेतकऱ्यांना त्याचा लाभ करुन दयावा. या अभियानतंर्गत खाजगी पध्दतीने कामे कमी पैश्यात व कमी वेळेत पूर्ण केली जावू शकतात. त्याबाबत प्रशासनाने विचार करावा. फक्त निधी खर्च करणे हे अभियानाचे उद्दिष्टे नसून चांगल्या दर्जाचे कामे करणे हे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने  सर्वानी प्रयत्न करणे आवश्यक आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते आपल्या मनोगतात म्हणाले, विभागातील सर्व पाझर तलाव जिवंत करुन त्यामाध्यमातून पाण्याची समस्या कमी होईल. अपुर्ण अवस्थेतील मागील वर्षाची कामे ठराविक मुदतीत पुर्ण झाली पाहिजे. शासनाच्या पैश्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे. असे ते म्हणाले.
            जलसंधारण व रोहयो सचिव डॉ. भापकर यावेळी म्हणाले, मराठवाडा विभागात जलयुक्त शिवार अभियानाची कामे चांगल्या पध्दतीने सुरु असून लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर कामे यशस्वी झाले आहेत. हे अभियान लोकचळवळ झाली असून या चळवळीला गती देण्यासाठी जलसंधारण मंत्री यांनी राज्यभर बैठका घेण्याचे निश्चित केले त्यानुसार औरंगाबाद मध्ये ही पाचवी बैठक आहे.  जलयुक्त शिवार अभियान यशस्वी होण्यासाठी विभागातील अडचणी समजून घेवून त्या अडचणी तात्काळ दूर करण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती.
            आढावा बैठकीच्या सुरुवातीला विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी  विभागातील जलयुक्त शिवार अभियानाच्या पुर्ण झालेल्या व सुरु असलेल्या कामांबाबत माहिती दिली. विभागातील सर्व जिल्हाधिकारी तसेच कृषी, जलसंधारण विभागाचे अधिकारी अभियानाच्या अनुषंगाने कामकाजाच्या माहितीचे सादरीकरण केले.