Wednesday 24 July 2019

फॉर्म नंबर 17 साठी आता ऑनलाईन प्रक्रिया !
दहावी, बारावी परीक्षेसाठी २९ जुलैपासून नोंदणी
औरंगाबाद, दि. २४:--- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च्‍ माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेस खासगी विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज (फॉर्म-१७) ऑनलाईन प्रक्रियेद्वारे २९ जुलै ते २४ ऑगस्टदरम्यान स्वीकारण्यात येणार आहेत, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.
खासगी विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी व बारावीसाठी नावनोंदणी अर्ज (फॉर्म-१७) ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागणार आहेत. त्यामुळे ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in तर बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळांचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी व इंग्रजीमधून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या पत्त्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यमनिहाय संपर्क क्रमांकाची यादी दिसेल. त्यापैकी एका संपर्क केंद्राची निवड विद्यार्थ्याने करावयाची आहे. या संपर्क केंद्रामार्फत प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन करण्यात येईल.
अर्ज भरण्याच्या तारखा:
· नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरणे - २९ जुलै ते २४ ऑगस्ट
· मूळ अर्ज, शुल्क, कागदपत्रे, संपर्क केंद्र शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे - ३० जुलै ते २६ ऑगस्ट
· संपर्क केंद्र शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी अर्ज, शुल्क, कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे - ३० ऑगस्ट
अर्जासाठी कागदपत्रे:
· शाळा सोडल्याचा दाखला, मूळ प्रत (नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र), आधार कार्ड, स्वतःचा पासपोर्ट फोटो (ऑनलाईन अर्ज भरताना कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर, मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत, या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी संपर्कासाठी अनिवार्य आहे.
अर्ज भरल्यानंतर:
· अर्जाची प्रत विद्यार्थ्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर येणार.
· अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्या.
· नमूद संपर्क शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहित मुदतीत जमा करा.
· विहित शुल्क रोखीने संपर्क शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करा.
· विद्यार्थ्यांसाठीच्या प्रतीवर स्वाक्षरी व शिक्का घेऊन तो स्वतःकडे ठेवा.
· ऑनलाईनबाबत अडचण आल्यास दू.क्र. ०२०-२५७०५२०८, २५७०५२०७, २५७०५२७१ वर संपर्क साधा.
· परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक.
****

No comments:

Post a Comment