Wednesday 9 November 2016



साखर कारखान्यांनी इथेनॉल
निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा.
                                                   मुख्यमंत्री- देवेंद्र फडणवीस
 * इथेनॉलसाठी बाजारपेठ उपलब्ध
 * राज्य शासन धोरण आखणार
* इथेनॉलवर शहर बसेस धावणार

औरंगाबाद,दि. 9 (विमाका ) :  साखर कारखान्यांनी केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता इथेनॉल सारख्या उपपदार्थ निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करुन इथेनॉलसाठी बाजारपेठे उपलब्ध  करुन देण्यासाठी राज्य शासन धोरण आखणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
             दीनदयाळनगर चित्ते पिंपळगाव ता. जि. औरंगाबाद येथील छत्रपती संभाजी राजे  साखर उद्योग लि. च्या 16 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या समारंभास कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, खा. रावसाहेब दानवे, आ. संदिपान भुमरे, आ. प्रशांत बंब, आ. अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            साखर कारखानदारीला प्रोत्साहन देतांनाच राज्य शासन त्यांना अर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, इथेनॉलसारख्या उपपदार्थ निर्मितीच्या क्षेत्रात साखर कारखाने अग्रेसर राहिले पाहिजेत अशी शासनाची भूमिका आहे. त्याकरीता शासन सकारात्मक असून  इथेनॉलचा वापर शहरीभागातील बस वाहतूकीसाठी करण्यावर भर राहणार आहे. नुकत्याच राज्य शासनाने 200 बसेस खरेदी केल्या असून त्या  प्रामुख्याने महिलांसाठी चालविल्या जाणार आहेत. या बसेस प्रायोगिक तत्वावर इथेनॉलवर चालविल्या जाव्यात  अशी सुचना शासनाने केली आहे. मुंबई महापलिकेला  शासनाने केलेल्या सुचनेनुसार आता मुंबईत इथेनॉलवर जकात कर माफ करण्यात आला असल्याने कारखान्यांना इथेनॉलची मोठी बाजारपेठ खुली झाली असल्याचे ही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, सहकाराच्या क्षेत्रामध्ये काम करतांना संस्काराने  सहकाराचे कार्य करुन यशस्वी होण्याचे उदाहरण या कारखान्याने निर्माण केले आहे.
                                                               -2-
हरीभाऊ बागडे यांच्या अथक प्रयत्नातून या कारखान्याने उपपदार्थ निर्माण करुन नफ्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. एखादया दिपस्तंभाप्रमाणे हा कारखाना चालविल्या जात आहे. हे कौतूकास्पद असल्याचे सांगून त्यांनी हरीभाऊंचे अभिनंदन केले.
            राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. देशात साखर कारखानदारी अडचणीत असतांना राज्यात भरीव एफआरपी शेतकऱ्यांना मिळवून दिली. शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखान्यांना शेतकऱ्यांना एफआरपी देण्याची  सक्ती केली. स्वाहाकार संपवून चांगला सहकार उभा करण्याचे काम सरकारने केले आहे. जिथे कारखान्याला मदत करणे आवश्यक आहे तिथे मदत करण्याचे धोरण सरकारने राबविले आहे.राज्यात उत्पादकता वाढविण्याची गरज लक्षात घेऊन राज्यात जलयुक्त शिवारच्या  माध्यमातून शाश्वत पाणी साठे व 10 हजार कोटीच्या सिंचन प्रकल्पाची कामे सुरु केली आहेत. ही कामे  तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगून औरंगाबाद व जालना जिल्ह्यात जलयुक्त शिवारची चांगली कामे केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले.
            शेती क्षेत्रातील गुंतवणूकीकडे शासन लक्ष देत असून  750 कोटी ठिंबक सिंचनासाठी व 2000 कोटी शेततळ्यासाठी दिले या प्रमाणे शेतकऱ्यांच्या मदतीचे धोरण आहे. याच अनुषंगाने 18000 कोटी रुपये शेतकऱ्यांना विमा व मदतीपोटी दिले असल्याचेही ते म्हणाले. कर्ज मुक्तीच्या विरोधात नसून शासन शेतकऱ्यांना कर्ज देवून सक्षम करण्याकडे भरीव लक्ष देत आहे. 5 हजार गावांची एकात्यिक शेती  विकास योना राबवित असून यासाठी जागतिक बँक 5 हजार कोटी रुपये देणार आहे. विविध व्यवस्था तेथे निर्माण करण्यात येणार आहेत असेही ते म्हणाले
            राज्य शासन शेतकऱ्यांच्या हिताचे काम करीत आहे. शेतकरी हाच केंद्र बिंदु आहे. परिवर्तनाची योग्य दिशा दिली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात नवी पहाट निर्माण करण्यासाठी आग्रही असल्याचे ही मुख्यमंत्री फडणवीस  यावेळी म्हणाले
            राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, ऊसक्षेत्र जोपासण्यासाठी शेतकऱ्यांनी शेततळ्यासारख्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता वाढविणे गरजेचे आहे. पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्याची गरज आहे. भविष्य उज्वल करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंतरपिक घेणे आवश्यक आहे. शेतीपूरक व्यवसाय हाती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा म्हणजे ते स्वावलंबी राहतील. शेतकरी समृध्द व्हायचा असेल तर जोडधंदा करणे आवश्यक आहे. जमिनीचे माती परीक्षण करुन घेऊन आपली शेती अधिक  कसदार करावी असेही आवाहन देशमुख यांनी केले. साखर कारखाने हे शेतकऱ्यांनीसाठी आहेत. त्यांच्या समृध्दीसाठी असल्याने त्यांनी कारखानदारांच्या पाठीशी रहावे असेही  ते म्हणाले.
           
                                                           
                                                             -3-
राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, राज्याच्या प्रगतीच्या रथाची शेती व उद्योग ही दोन चाके आहे. ती चांगली चालली पाहिजेत यासाठी शासन सर्देव प्रयत्नशील आहे. सर्व कारखान्यांनी शेतकऱ्यांसाठी पूरक उद्योग सुरु करून शेतकऱ्यांना सहाय्य करावे. पाण्याच्या बाबतीत या कारखान्यात व परिसरात जागृती झाली असल्याने चांगली प्रगती होइ्रल अशी अशा व्यक्त करुन कारखान्याबद्दल त्यांनी कौतूक केले.
            खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, साखर कारखानदारीची परिस्थिती बदलली असून ऊस उत्पादक शेतकरी चांगल्या दराबाबत अपेक्षा ठेवून  साखर कारखाने चालवित आहेत. अनेक कारखाने बंद होत आहेत मात्र स्वच्छ कारभार आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असल्यामुळे काही कारखाने चांगले चालत आहेत. असे सांगून खा. दानवे यांनी साखर कारखानदारीच्या बदलत्या परिस्थितीचे विश्लेषण आपल्या भाषणात केले.
            कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष  तथा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले. त्यापैकी महत्वाचा निर्णय म्हणजे पिकविमा योजना आहे. वर्षाला 3000 कोटी प्रमाणे विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देवून सरकारने दिलासा दिला आहे. विम्याच्या रकमेचे वितरण आता बँक खात्याच्या माध्यमातून मिळत असल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. जलयुक्त शिवार अभियानच्या माध्यमातून डोंगरापासून पायथ्यापर्यंत पाणी अडवले जात आहे. या अभियानामुळे अभिनव जलक्रांती झाली आहे. याचे श्रेय राज्य शासनाला आहे. या अभियानात आणखी गावे समाविष्ठ करुन अधिक शेतकऱ्यांना लाभ होईल अशी शासनाची धारणा आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे आणि जलयुक्त शिवारच्या कामांमुळे शेतकरी अधिक समृध्द होणार आहे. पाणी साठवून ते जपून वापरण्याची गरज असून शेतकऱ्यांनी आता पाणी काटकसरीचा व बचतीचा मार्ग स्विकारला पाहिजे. असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
            साखर कारखान्याच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना चांगली सेवा देत आहोत. उपपदार्थ निर्मिती, वीज उत्पादन आणि इतर उपक्रमाच्या माध्यमातून कारखान्याची अर्थिकस्थिती चांगली केली आहे. त्यामुळे कारखाना शेतकऱ्यांना ऊसाचा चांगला भाव देत आहे. गेल्या वर्षी 1950 रुपये दर दिला असे सांगून यावर्षी 2100 रुपये ऊसाला भाव देण्याची घोषना श्री. बागडे यांनी यावेळी  केली. यावेळी उत्कृष्ट कार्य केलेल्या शेतकऱ्यांचा तसेच फुलंब्री तालुक्यातील जलयुक्त शिवारच्या कामामध्ये योगदान दिलेल्या राम भोगले व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते जलयुक्त शिवार अभियानाच्या पुस्तिकेचे विमोचनही करण्यात आले.
या समारंभास संचालक मंडळ ऊस उत्पादक शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी विवेक देशपांडे यांनी प्रास्ताविक केले तर शेवटी उपाध्यक्ष दामोदर नवपुते यांनी आभार मानले.
-*-*-*-*-*-*-*

No comments:

Post a Comment