Wednesday 9 November 2016

महाराष्ट्र गुंतवणूक, रोजगार निर्मित देशात अव्वल



वृत्त क्रं : 255                                                                                                दिनांक : 9.11.2016

महाराष्ट्र गुंतवणूक, रोजगार निर्मित देशात अव्वल
                                                  
                                                 मुख्यमंत्री- देवेंद्र फडणवीस

        औरंगाबाद,दि. 9 (विमाका ) : सर्वाधिक औद्योगिक गुंतवणूक व रोजगार उपलब्धतेत महाराष्ट्र  देशात अव्वलस्थानी असून परकिन्स कंपनीने  मराठवाड्यासह औरंगाबाद-जालना येथील युवकांना रोजगार कुशल बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. 
येथील शेंद्रा डी.एम.आय.सी अर्थात ऑरीक परिसरातील परकिन्स इंडिया प्रा. लि. उद्योगांच्या नवीन इंजिन प्लॅटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या  कार्यक्रमास विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई,सहकार मंत्री सुभाष देशमुख, परकिन्स कंपनीचे चेअरमन रिचर्ड कॉट,  खा. चंद्रकात खैरे, खा. रावसाहेब दानवे, आ. सुभाष झांबड,  आ. संजय सिरसाट आ. अतुल सावे  यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, परकिन्स कंपनी मुळची  ब्रिटीश असूनही या कंपनीच्या उत्पादनात 70 टक्के  वाटा हा भारतीय बनावटीचा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील मेक इन इंडियाचा हेतू या माध्यमातून  सफल झाला आहे. परकिन्स कंपनीने अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्तम दर्जा जागतिक बाजारपेठेत टिकवून ठेवलेला आहे. झिरो डिक्फेक्टमुळे त्यांनी गुणवत्ता नियंत्रणही केले आहे. त्यामुळे भारतातून उत्तम दर्जाचे उत्पादन निर्यात होत आहे. पाण्याचा सुयोग्य पद्धतीने पुर्नवापरही त्यांनी करुन आदर्श निर्माण केला आहे.
            मुख्यमंत्री श्री. फडणवीस  म्हणाले की, परकिन्स कंपनीमुळे औरंगाबाद मधील औद्योगिक विकासात एक प्रगतीचे पाऊल पडले आहे. परकिन्स कंपनी आपल्या उत्पादनाची गुणवत्ता टिकवत आपल्या व्यवसायात निश्चित प्रगती करेल.  कंपनीने  कुशल कामगारांसाठी कंपनीमध्ये एक प्रशिक्षण केंद्र सुरु करुन त्या माध्यमातून उत्तम कामगार घडवून कंपनीमध्ये त्यांना संधी दिल्यास   निश्चितच कंपनीच्या विकासासोबत या परिसरातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. या कंपनीच्या माध्यमातून औरंगाबाद मधील या ऑरीक सिटीमध्ये एक चांगला सेवा उद्योग उभा राहिला आहे. 2022 पर्यंत ऑरीक ही युनिक स्मॉट सिटी निर्माण होईल. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यावेळी म्हणाले की,  1996-1997 मध्ये औरंगाबाद हे पंचतारांकीत औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित झाले.  येथील शेतकऱ्यांनी उद्योगासाठी त्यावेळी आपल्या जमिनी दिल्यामुळे आज येथील उद्योग प्रगती करत आहे.परकिन्स कंपनीने या परिसरातील बेरोजगार युवकांना कंपनीमार्फत प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन दिल्यास त्यांना मदत होईल. औरंगाबाद विमानतळाचे विस्तारीकरण लवकरच करण्यात येणार असून त्याचा सुध्दा फायदा येथील उद्योगांना होईल. असे त्यांनी यावेळी सांगितले.
            उद्योग मंत्री श्री. देसाई म्हणाले की, राज्य शासन कौशल्य विकास कार्यक्रमांवर भर देत असून त्याचा फायदा  उद्योगांना होणार आहे. परकिन्स उद्योग हा ऑरीक सिटी मधील पहिला उद्योग ठरला असून  ऑरीक सिटी मधील उद्योगामुळे या परिसरातील तरुणांना  रोजगार मिळणार आहे.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक परकिन्स कंपनीचे प्रमुख रिचर्ड कॉट यांनी केले. तर सूत्रसंचालन व्यवस्थापकीय संचालक जावेद अहमद यांनी केले.  कार्यक्रमाला डीएमआयसीडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्केश शर्मा, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडाळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाऊनशिप लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम कुमार, सह व्यवस्थापकीय संचालक  गजानन पाटील, अपर आयुक्त गोंविद बोडके, परकिन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
-*-*-*-*-*








No comments:

Post a Comment