Sunday 28 August 2016



जलयुक्त शिवार ही लोकसहभाग मिळालेली सर्वांत मोठी योजना
                                            -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  
  
औरंगाबाद, दि. 28-  जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यात तसेच मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठे निर्माण झाले असून राज्यामध्ये जलयुक्त शिवार  ही लोकसहभाग मिळालेली सर्वांत मोठी योजना असल्याचे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केले.
फुलंब्री येथे जलयुक्त शिवार योजनेतर्गंत लोकसहभागातून झालेल्या फुलमस्ता नदी खोलीकरण कामांचे जलपुजन प्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, कामगार, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास, माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, खा. रावसाहेब दानवे, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, श्री. एकनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, शासनाने राज्य  पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी ही योजना सुरु केली. 2019 पर्यंत राज्यातील  पाणी टंचाई दूर करणाचे उद्दिष्ट ठेवले असून राज्यात 20 हजार गावापैकी 4 हजार 500 गावे जलयुक्त झाली आहेत. या अभियानासाठी राज्यातील तज्ञ लोकाचे मार्गदर्शन मिळत असून हे अभियान सर्वत्र यशस्वी होत आहे. 2019 पर्यंत राज्यातून दुष्काळ हद्दपार करु असा  विश्वास आहे. गावातील  सर्व लोकं एकत्र येवून लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान   प्रभावीपणे सहभाग नोंदवीत आहेत. जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यात जल स्वातंत्र्यांची क्रांती होत आहे. यामुळे मराठवाड्यात परिवर्तन घडून येत असून पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली आहे. राज्यात 2018 पर्यंत राज्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींना डिजीटल करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत मंत्र्यालयस्तरापर्यंत जोडली जाईल. राज्यात आतापर्यंत 17 हजार हजार शाळा डिजीटल झाल्या असून 2018 पर्यंत राज्यातील सर्व शाळा डिजीटल स्वरुपाच्या करण्यात येतील, स्वच्छ भारत अभियानात राज्यातील 7 हजार ग्रामपंचायती हगणदारी मुक्त झाल्या असून प्राथमिक आरोग्य केंद्राला डिजीटल करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
विधानसभा अध्यक्ष श्री. बागडे आपल्या मनोगतात म्हणाले की, फुलंब्री तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानातर्गंत स्वंयसेवी संस्थाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम झाले असून कमी निधीमध्ये खाजगी यंत्रणामार्फत नदीचा गाळ काढणे, खोलीकरण व रुंदीकरणाचे  कामे झाली आहेत. असे त्यांनी सांगितले. खा. रावसाहेब दानवे यांनी सुध्दा यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते जलयुक्त शिवार अभियानात फुलंब्री तालुक्यात काम केलेल्या जॉइट इंटरनॅशनल, रुबी गृप, इंडियन पल्स ग्रेन्स मुंबई या स्वंयसेवी संस्थाचा सत्कार करण्यात आला.  जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल  त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधानसभा अध्यक्ष श्री बागडे यांच्या उपस्थितीत फुलंब्री शहरालगत असलेल्या  फुलमस्ता नदीचे जलपुजन करण्यात आले. महात्मा फुले जलभूमी अभियानातर्गंत कृषी विभागातर्फे फुलमस्ता नदीचा गाळ काढणे, खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहास शिरसाट यांनी केले. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय अधिकारी केशव नडके, उपविभागीय कृषी अधिकारी धमेंद्र कुलथे, उपजिल्हाधिकारी ( रोहयो ) श्रीमती सानप, तहसीलदार संगिता चव्हाण यांच्यासह कृषी जलसंपदा विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.




No comments:

Post a Comment