Sunday 28 August 2016



जलद न्यायदानासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग आवश्यक
                                            -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  
  
औरंगाबाद, दि. 26-  गती, निष्पक्षता आणि पारदर्शकता ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाची वैशिष्टे आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा अंगिकार करुन आपण न्यायसंस्थेवरील प्रलंबीत प्रकरणांचे ओझे कमी करु शकतो. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा  प्रभावी उपयोग करणारे अग्रगण्य उच्च न्यायालय म्हणून मुंबई उच्च न्यायालय देशात ओळखले जावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या 35 व्या वर्धापन दिनानिमित्त  उच्च न्यायालयाच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्या. रविंद्र बोर्डे हे होते. यावेळी  मुख्य न्यायमुर्ती डॉ. मंजुळा चेल्लूर, न्या. श्रीमती व्ही.के. तहिलरामाणी,राज्याचे ॲडव्होकेट जनरल रोहित देव, अतिरिक्त सॉलीसिटर जनरल अनिल सिंग, उच्च न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष पी.आर.पाटील, उपाध्यक्ष संजीवनी घाटे-देशमुख,  राहूल तांबे, सचिव बी.आर. केदार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाला  कामगार, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास, माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर आणि अन्य लोकप्रतिनिधी व पदाधिकारी, केरळ उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमुर्ती अरविंद सावंत यांच्यासह आजी-माजी न्यायाधीश, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांच्यासह विविध अधिकारी आणि वकील उपस्थित होते.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्याकडे कोणत्याही यंत्रणेला पायाभूत आणि अनुषंगिक सुविधांची उणीव भासते. देशाची लोकसंख्या आणि अन्य बाबी पाहता हे स्वाभाविक आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्याच पाहिजेत. पण त्याच बरोबर नवे तंत्रज्ञान उपयोगात आणणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे  कार्यक्षमता वाढते, याचा सार्वत्रिक अनुभव आहे.
 औरंगाबाद खंडपीठाच्या इमारत  विस्तारीकरणासाठी, उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींच्या सहा निवासस्थानासाठी तसेच विश्रामगृह उभारण्याच्या प्रस्तावाला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे, असे सांगून या करीता लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे ही ते म्हणाले.
औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या उभारणीसाठी शासन कटीबद्ध आहे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय विद्यापीठात राज्यातील विद्यार्थ्यासाठी 30 टक्के जागा राखीव ठेवल्या जाव्यात, अशी भुमिका राज्य विधीमंडळात मांडली गेली असून या संदर्भात योग्य तो मार्ग काढला जाईल. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्य घटनेने निर्माण केलेल्या संस्था हे देशाचे वैभव आहे. असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात काही संस्थांना कधीकधी विश्वासार्हतेच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले. मात्र न्यायसंस्था याला अपवाद राहीली. या संस्थेवर जनतेचा विश्वास असून हा विश्वास टिकवून ठेवणे ही एक आव्हनात्मक जबाबदारी आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेने निर्माण केलेल्या संस्थाबाबत काढलेल्या उद् गाराचा उल्लेख करुन मुख्यमंत्री म्हणाले की, या संस्थांचे अधिकार, कार्यक्षेत्र अशा बाबी वेगवेगळया असल्यातरी त्यांचे उद्दीष्ट हे सर्वसामान्य माणसाचे हित साधणे हेच आहे. या संस्थांचे उद्दीष्ट राज्यघटनेने निर्धारित केले आहे.
मुख्य न्यायमुर्ती डॉ. चेल्लूर यांनी त्यांच्या भाषणात खंडपीठाच्या स्थापनेत तत्कालीन मुख्य न्यायमुर्ती व्यंकटराव देशपांडे यांनी बजावलेल्या कामगिरीचा गौरवपुर्ण उल्लेख केला. सततच्या प्रयत्नामुळे हे खंडपीठ उभे राहिले, असे नमूद करुन त्या म्हणाल्या की,            खंडपीठाचा वर्धापनदिन हा आनंदाप्रमाणे आत्मपरिक्षणाचा दिवस आहे. मला न्यायालयाकडून वेळेत  न्याय मिळेल असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होणे आवश्यक आहे. थेट न्यायालयाकडे येणाऱ्या प्रकरणाची संख्या कमी होण्याकरीता पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. या मार्गाची माहिती सामान्य नागरिकांना झाली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यकत केली. लोक न्यायालय किंवा कायदाविषयक माहिती  देणारे शिबीर हा माहिन्यातून एकदा आयोजित करावयाचा उपक्रम ठरु नये, असे त्या म्हणाल्या.
 न्या. तहिलरामाणी यांनी खंडपीठाच्या स्थापनेचा इतिहास विशद केला. या संदर्भात त्यांनी तत्कालीन मुख्य न्यायमुर्ती आणि इतरांनी दिल्याल्या योगदानाचा गौरवपुर्ण उल्लेख केला. लोकशाही व्यवस्थेत कायदयाच्या राज्याला महत्व आहे, असे उद गार काढून त्यांनी न्यायदानाची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक असल्याचा अनुभव सामान्य नागरिकाला यायला हवा असे सांगितले.
न्या. रविंद्र बोर्डे यांनी खंडपीठाची वाटचाल मांडली. या संदर्भातील आकडेवारी नमूद करुन त्यांनी खंडपीठाचा उपयोग या भागातील जनतेला होत आहे. असे सांगितले.
वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. सचिव बी.आर.केदार यांनी आभार मानले. ॲड. चैतन्य धारुरकर यांनी सुत्रसंचालन केले.
प्रारंभी वकील संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी तसेच खंडपीठातील मुख्य सरकारी वकील अमरसिंह गिरासे, केंद्र शासनाचे वकील संजीव देशपांडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.



No comments:

Post a Comment