Tuesday 16 August 2016



मराठवाड्यात स्वातंत्र्यदिनी नऊ सायबर लॅब कार्यान्वित

            औरंगाबाद, दि. 16 : राज्य शासनाने महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत प्रत्येक जिल्हा मुख्यालयी तसेच प्रत्येक पोलीस आयुक्तालयात सायबर लॅब कार्यान्वित करण्याचे ठरविले असून या प्रकल्पांतील मराठवाडा विभागातील सर्व म्हणजे आठही जिल्ह्यात तसेच औरंगाबाद येथील पोलीस आयुक्तालयात सायबर लॅबचे काल उद्घाटन झाले.
            औरंगाबाद येथील पोलीस आयुक्तालयातील तसेच ग्रामीण पोलीस मुख्यालयातील सायबर लॅबचे उद्घाटन पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाले. बीड येथे पालकमंत्री पंकजाताई मुंडे, जालना येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर, परभणी येथे पालकमंत्री दिवाकर रावते, हिंगोली येथे पालकमंत्री दिलीप कांबळे तर लातूर येथे कामगार, भुकंप, पुनवर्सन, कौशल्य विकास आणि माजी सैनिक कल्याण खात्याचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, उस्मानाबाद येथे पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर, नांदेड येथे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते या लॅबचे उद्घाटन झाले.  
माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात ई-बॅंकिंग, पेपरलेस कार्यालय, सोशल मिडिया आदींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे वापरुन गुन्हे करण्याच्या विविध युक्त्या सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जात आहेत, या गुन्ह्यांना आळा घालण्याबरोबरच हे गुन्हे करणाऱ्यांना वचक बसावा, या दृष्टीने गृह विभागाने महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालये आणि पोलीस आयुक्तालय क्षेत्रातसायबरलॅबउभारण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला. या निर्णयानुसार मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या सायबर लॅबचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनी मान्यवरांच्या हस्ते झाले.
औरंगाबाद
नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगार करत आहेत. त्यामुळे पोलीसांची जबाबदारी मोठी असून सर्व नागरिकांची सुरक्षा, जीविताचे रक्षण पोलीस करत असतात. त्यासाठी समाजातील जागरूक नागरिकांनी पोलींसाप्रमाणेच भूमिका पार पाडावी, असे आवाहन पर्यावरण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.
पोलीस आयुक्तालयातील औरंगाबाद शहर सायबर लॅबच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष एम.एम. शेख, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया राहटकर, महापौर त्र्यंबक तुपे, आमदार अतुल सावे, संजय शिरसाठ, इम्तीयाज जलील, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची यावेळी उपस्थिती होती.
सायबर लॅबमधील अत्याधुनिक सॉफ्टवेअरबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कल्याणकर यांनी यावेळी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. त्यांनी सायबर लॅबची उपयुक्तता आणि पासपोर्ट ऑनलाईन सॉफ्टवेअरबाबत माहिती देवून नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतच्या अपेक्षा पूर्ण करू. पासपोर्ट ऑनलाईन सॉफ्टवेअरमुळे पासपोर्ट पडताळणीसाठी लागणारा वेळ  कमी होण्यासाठी मदत होणार आहे असे सांगितले.
 प्रारंभी पोलीस विभागातर्फे पालकमंत्री रामदास कदम यांना मानवंदना देण्यात आली. त्यांनी सायबर लॅब, सेफ सिटी प्रकल्पाची पाहणी केली. लॅबबाबत सविस्तर माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पालकमंत्री रामदास कदम यांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी करून आभार मानले.
औरंगाबाद (ग्रामीण )
बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात पोलीस यंत्रणेच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने औरंगाबाद ग्रामीण पोलीस सायबर लॅबची स्थापना महत्वाचे पाऊल असून वाढत्या गुन्हेगारीला अधिक तत्परतेने प्रतिबंध घालणे या अद्यावत सायबर लॅबमुळे शक्य होईल, असे प्रतिपादन पर्यावरण तथा जिल्हयाचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.
पोलीस अधिक्षक औरंगाबाद ग्रामीण कार्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या औरंगाबाद ग्रामीण पोलीस सायबर लॅबचे उद्घाटन पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते करण्यात आले,  त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा. चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, महापौर त्र्यंबक तुपे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, विशेष पोलीस महानिरीक्षक (औरंगाबाद परिक्षेत्र) अजित पाटील, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, पोलीस अधिक्षक औरंगाबाद ग्रामीण नवीनचंद्र रेड्डी उपस्थित होते.
गृह विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतुन आज स्वातंत्र्यदिनी एकाच दिवशी  संपूर्ण राज्यात 51 ठिकाणी  पोलीस सायबर लॅब सुरू करून सायबर क्षेत्रातील वाढत्या गुन्हेगारीला समूळ नष्ट करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल टाकलेले आहे ,असे सांगून रामदास कदम पुढे म्हणाले की,  माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामूळे गुन्हेगारीचे स्वरुप बदलत असून या परिस्थितीत कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस तपास यंत्रणेला आजच्या काळात सायबर लॅबसारख्या महत्वाच्या अत्याधुनिक यंत्रणा अत्यावश्यक ठरणाऱ्या आहेत,
गृह विभागचा सायबर सेल हा महत्वपूर्ण उपक्रम असून यामुळे समाजाला अद्यावत यंत्रणेच्या सहाय्याने सुरक्षा देणे शक्य होणार आहे, असे चंद्रकांत खैरे यांनी यावेळी  सांगितले. डॉ. दांगट यावेळी म्हणाले की ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान ही आत्ताच्या समाजाची विकास माध्यमे आहे. ज्याचा वापर समाज विघातक घटकांकडून चुकीच्या पध्दतीने सामाजिक सुरक्षिततेला धोक्यात आणण्याच्या दृष्टीने होत आहे. या  नव्या आव्हानाला तोंड देण्यासाठी पोलीस दल, सुरक्षा यंत्रणा अधिक मजबुत असणे आवश्यक आहे, त्या दृष्टीने सायबर लॅब हे उपयुक्त व परिणाम साधणारे माध्यम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांनी सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी अद्यावत सॉफ्टवेअर, प्रशिक्षित अधिकारी आणि आधुनिक यंत्रणेचा वापर  या सायबर लॅबमध्ये केला जाणार असल्याचे यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधिक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी केले.
बीड
सायबर विश्वातील गुन्हेगारी प्रकरणांचा तपास अधिक अत्याधुनिक  तंत्रज्ञान यंत्रसामुग्रीयुक्त सायबर लॅबमुळे अधिक सोपा होईल असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केले.
बीड येथील पोलीस अधिक्षक कार्यालयात अत्याधुनिक सायबर लॅब स्थापन करण्यात आली असून या लॅबचे आणि फॉरेन्सिक मोबाईल व्हॅनचे लोकार्पण पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडीत, आमदार जयदत्त क्षीरसागर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
सायबर गुन्हे कमी होतील आणि लॅबचा कमीतकमी वापर व्हावा अशी शुभेच्छा व्यक्त करुन पालकमंत्री पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, दिलेल्या व्यक्ती स्वातंत्र्याचा वाईट उपयोग करणाऱ्यांचा, व्हर्च्युअल जगात गैरवर्तणूक करणाऱ्यांचा प्रतिबंध करण्याची गरज निर्माण झाली आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेला सुसज्ज व्हावे लागेल. आधुनिक तंत्रज्ञानाने माणसाला तंत्रस्नेही केले असले तरी याचा दुरुपयोग रोखण्यासाठी अनेक आव्हाने आपल्या समोर उभी राहत आहेत. देशात तंत्रज्ञानाची मोठी क्रांती झाली आहे. घरोघरी प्रत्येकाकडे तंत्रज्ञान पोहोचले आहे. मोबाईलसारख्या तंत्रज्ञानाचा वापर खुप वाढत चालला आहे. चुटकीसरशी माहिती मिळवण्याची साधने अनेक झाली मात्र त्याच प्रमाणात सायबर गुन्हे वाढत चालले आहेत. सामान्य नागरिकांचे सायबर विश्वातील फसवणूकीपासून रक्षण करण्यासाठी पोलीस दल अधिक सक्षम होत असल्याबद्दल पालकमंत्री मुंडे यांनी समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर गुन्ह्यांच्या बंदोबस्तासाठी पोलीस दल सुसज्ज करण्यासाठी पुढाकार घेतला असून तरुणवर्गाने सायबर साधनांचा सुयोग्य वापर करावा आणि स्वत:चे रक्षण होण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे सांगून यानिमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शुभसंदेश पालकमंत्री मुंडे यांनी वाचून दाखविला.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयसिंह पंडीत, आमदार जयदत्त क्षीरसागर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचीही भाषणे झाली. पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर आपल्या प्रास्ताविकाम सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि सोशल मिडियाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात वाढला आहे. त्याचप्रमाणे इंटरनेटमुळे निर्माण झालेल्या व्हर्च्युअल विश्वातील सायबर गुन्ह्यांचा बंदोबस्त करण्याची गरज पुढे आली आणि त्यादृष्टीने महाराष्ट्र पोलिसाने सायबर लॅबची संकल्पना राबविली आहे. या लॅबच्या माध्यमातून आता  सायबर गुन्हे शोधण्यासाठी व सिध्द करण्यासाठी मदत होणार आहे. यामुळे सायबर विश्वातील गुन्हेगारी रोखण्यात यश मिळणार आहे.
            यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतील पुरस्कारप्राप्त पत्रकार वैभव स्वामी, अभिजित नखाते आणि संदीप बेदरे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच प्रसंगावधान राखून आपल्या आईचा जीव वाचविणाऱ्या प्रतिक ईश्वर धस या मुलाचाही सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस उपअधिक्षक गणेश गावडे यांनी केले तर आभार अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलबुर्गी यांनी मानले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालना
महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत सायबर गुन्हेगारांवर वचक बसविण्याबरोबरच गुन्ह्यांची तात्काळ उकल होऊन आरोपींचा तातडीने शोध लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेले जालना जिल्हा सायबर लॅब  हे अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात स्वतंत्र इमारतीमध्ये उभारण्यात आलेल्या जालना जिल्हासायबर लॅबचे उदघाटन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी श्री लोणीकर बोलत होते.
            यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योतिप्रिया सिंह, अपर पोलीस अधीक्षक राहूल माकणीकर, लॅबचे प्रमुख व्ही.एच. इज्जपवार, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योतिप्रिया सिंह यांनी पॉवर पॉईंटच्या माध्यमातून सायबर लॅबची सविस्तर  माहिती‍ दिली.
परभणी
परभणी जिल्हा पोलिस सायबर लॅबचे उद्घाटन पोलिस अधीक्षक कार्यालय येथे परिवहऩ, खारभूमी विकास मंत्री तथा परभणी जिल्हयाचे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते झाले.
       यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेश विटेकर, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार मोहन फड, महापौर संगीता वडकर, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा पोलिस अधीक्षक नियती ठाकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर, महानगरपालिका आयुक्त राहुल रेखावार, अपर पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, परभणी येथील सायबर लॅबचे नोडल अधिकारी पोलिस निरीक्षक संजय हिबारे, संबंधित विभाग व यंत्रणांचे अधिकारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
       पालकमंत्री दिवाकर रावते म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संपर्काच्या आधुनिक साधनांद्वारे, जग खूप जवळ आले आहे. परंतु इंटरनेटशी संबंधित गुन्हेही दिवसेंदिवस वाढत आहेत. हा विषय अतिशय संववेदनशील असून आर्थिक अफरातफर, बँक अकांऊट हॅकिंग, ई-मेल हॅकिंग, सायबर हल्ले, व्यक्तीच्या सायबर ओळखींची चोरी यासारखे प्रकार वाढत असल्याने या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर लॅब निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचेही पालकमंत्री श्री रावते यांनी सांगितले. 
      परभणी येथील सायबर लॅबचे नोडल अधिकारी पोलिस निरीक्षक संजय हिबारे असून २ पोलिस अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक ससाने व पोलिस उपनिरीक्षक आबेज काझी व सात पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ९ संगणक तसेच अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या साह्याने इंटरनेटशी संबंधित, आर्थिक गुन्हे, ऑनलाईन बँक गुन्हे, सोशल मिडियावरील गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरीता तसेच सायबर गुन्ह्यांचा जलद व गतीमान तपास करण्याकरीता त्यांचा वापर करता येणार आहे. या लॅबमुळे परभणी जिल्हा पोलीस दलही आणखी सक्षम आणि अत्याधुनिक होणार आहे.
      माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तसेच समाजमाध्यमांच्या माध्यमातून घडणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी राज्यातील सर्व सायबर लॅब सुसज्ज करण्यात आल्या आहेत. आणि मुंबई मुख्यालयाशी जोडण्यात आलेल्या आहेत.
नांदेड
गुन्हेगारीच्या बदलत्या स्वरुपानुसार त्याला  प्रतिबंध  करण्यासाठी वैज्ञानिक क्षमतेचा पुरेपूर वापर करावा लागेल. त्यादृष्टीने नांदेड पोलीस दल सक्षम होत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी येथे काढले. नांदेड पोलिस दलाच्या सायबर लॅबचे उद्घाटन राज्यमंत्री श्री. खोतकर यांच्या हस्ते झाले. नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर  महापौर शैलजा स्वामी, आमदार सर्वश्री अमर राजूरकर, डी. पी. सावंत, हेमंत पाटील, उपमहापौर शफी कुरेशी, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, पोलीस अधीक्षक संजय ऐनपुरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना राज्यमंत्री खोतकर पुढे म्हणाले की, जग वेगाने बदलते आहे. तंत्रज्ज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे गुन्ह्यांच्या प्रकारात, स्वरुपातही बदल होत आहेत. त्यादृष्टीने राज्यात माहिती तंत्रज्ज्ञान क्षेत्रातील गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर लॅबची संकल्पना मांडली. या लॅबचे राज्यात एकाच वेळी उद्घाटन करण्यात येत आहे. बदलत्या जगात गुन्हेगारीचे प्रकारही बदलले आहेत. त्यामुळे पोलीस दलही बदलले पाहिजे. या गुन्ह्यांचा तपास प्रभावी आणि चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या लॅबचा निश्चित वापर होणार आहे. ज्यामुळे गुन्ह्यांतील शिक्षेच प्रमाण वाढेल आणि गैरप्रकारांना जरब बसेल. नव समाज माध्यमांवर शांतता-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी नजर ठेवणे आवश्यक ठरू लागले आहे. त्यादृष्टीनेही या सायबर लॅब उपयुक्त ठरतील. पोलिस दलांला अद्ययावत ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ज्ञान उपलब्ध करून देण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सुरवातीला जिल्हा पोलीस अधीक्षक ऐनपुरे यांनी प्रास्ताविकात सायबर लॅब, तसेच आय-कार आणि टूरीस्ट पोलीस व्हॅन या संकल्पनांबाबत माहिती दिली. श्री. देवराय यांनी सुत्रसंचालन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर राज्यमंत्री खोतकर यांनी पोलीस मुख्यालयातील सेफ सिटी-प्रोजेक्ट या वैशिष्ट्यपुर्ण प्रकल्पाचीही प्रत्यक्ष पाहणीद्वारे माहिती घेतली. हा प्रकल्प आणखी सक्षम करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
लातूर
सायबर गुन्हेगारीवर वचक बसविणे व गुन्हयांची तात्काळ उकल करून आरोपींचा शेाध घेऊन त्यांना जेरबंद करण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयात सायबर लॅब स्थापन करण्यात आली असून या लॅबचे उदघाटन कामगार कल्याण व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार सुनील गायकवाड,जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड, अपर पोलीस अधिक्षक लता फड, सायबर लॅबचे प्रमुख पोलीस निरिक्षक बालाजी सोनटक्के,उपविभागीय अधिकारी प्रताप काळे यांच्यासह पोलीस विभागतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस अधिक्षक राठोड यांनी सायबर लॅब बाबतची माहिती मंत्री महोदयांना दिली. यावेळी श्री.निलंगेकर यांनी लॅबची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
उस्मानाबाद
अदययावत  सुसज्ज अशा उस्मानाबाद पोलीस सायबर लॅबमुळे जिल्हयातील  गुन्हयांना आळा बसेल अशा विश्वास   राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी सायबर लॅब उदघाटन प्रसगी  व्यक्त केला. 
 या उदघाटन कार्यक्रमास आमदार मधुकरराव चव्हाण,विधान परिषदेचे सदस्य सुरजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते ,परिविक्षाधीन युष  प्रसाद, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक  राजतिलक रोशन आदि मान्यवर उपस्थित होते.
            मंत्रीमहोदयांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात अदययावत सायबर लॅबचे उदघाटन केले पाहणी केली. त्यानंतर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश वाचून दाखविला.
             प्रस्ताविक करताना पोलीस अधीक्षक  पंकज देशमुख यांनी  उस्मानाबाद पोलीस विभागाची   सायबर लॅब बाबतची माहिती दिली.  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी उस्मानाबाद जिल्हयातील पोलीस विभागाने जिल्हयात विविध कार्यक्रमाद्वारे राबविलेल्या  विविध  उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धीरज पाटील, विधान परिषदेचे सदस्य सुरजितसिंह ठाकूर यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली.अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली घाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हिंगोली
सायबर गुन्हेगारी रोखण्याबरोबरच गुन्ह्यांचा तात्काळ तपास करुन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालये आणि पोलीस आयुक्तालयांच्या क्षेत्रात सायबर लॅब सुरु करण्याचा गृह विभागाचा हा विशेष उपक्रम असल्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे म्हणाले.   
येथील पोलिस अधिक्षक कार्यालयातील सायबर लॅब च्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार रामराव वडकुते,  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लक्ष्मीताई यशवंते, नगराध्यक्षा श्रीमती अनिता सुर्यतळ, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, पोलीस अधिक्षक अशोक मोराळे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. कांबळे म्हणाले, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन  गृह विभागाने राज्यात 51 सायबर लॅब पैकी 44 सायबर लॅबचे एकाच दिवशी  जिल्हा मुख्यालय  आणि  पोलीस  आयुक्तालयांच्या  क्षेत्रात सायबर लॅब  44  आजपासून कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सायबर गुन्ह्यांच्या नियंत्रणासाठी  महाराष्ट्र  शासनाचे  हे  एक  महत्वाचे  पाऊल  ठरणार  आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी सायबर गुन्ह्यांचं स्वरुप व प्रकार बदलत चालले असून आपण याबाबत दक्ष राहायला हवे तसेच नागरिकांमध्ये आयटी ॲक्टच्याबाबतही जागरुकता करणे आवश्यक आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा पालीस अधिक्षक अशोक मोराळे म्हणाले की, या सायबर लॅबमुळे पोलीस प्रशासनाला मदत होणार आहे. सायबर लॅबमुळे तंत्रज्ञान, सोशल मिडीया यांच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसणार आहे. सायबर लॅबमुळे गुन्ह्याचा तात्काळ शोध लागण्यासही मदत होणार आहे,  असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. विजय निलावार यांनी केले. तर अतिरिक्त पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ यांनी आभार मानले. यावेळी पोलीस विभागासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment