Wednesday, 30 October 2019

औरंगाबाद विभागात एकता दौडची तयारी पूर्ण

औरंगाबाद दि. 30 (विमाका) - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शासकीय कार्यालय, शाळा यांच्या सहभागाने एकता दौड चे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण झाली आहे. हा दिवस देशभरात ‘ राष्ट्रीय एकता दिवस ’ म्हणून साजरा केला जातो.
राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 'रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात येते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये व तद्नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा व जनतेला त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी यादृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने मराठवाडा विभागातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजित दौडद्वारे एकतेचा संदेश देण्यात येणार आहे. या एकता दौडमध्ये क्रीडा संघटना, शासकीय कार्यालय,  शाळा,  महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत.
औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी अशा चारही जिल्ह्यात राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने एकतेचा संदेश देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने गुरुवार दि.31 ऑक्टोबर रोजी ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात आले आहे.
औरंगाबाद जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सकाळी  6.15 वा. राष्ट्रीय  एकता दौड स्थळ क्रांतीचौक ते बाबा पेट्रोल पंप पर्यंत आयोजित करण्यात आलेली असून या कार्यक्रमास सर्व अधिकारी व कर्मचारी यांना  या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीने  सकाळी ८.००  वा. शहरातील मम्मादेवी येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापासून ते शिवाजी पुतळा इथपर्यंत एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडच्या कार्यक्रमास  शासकीय, निमशासकीय,सहकारी संस्थेतील अधिकारी, कर्मचारी तसेच  जालनेकरांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड मार्फत सकाळी 8.00  वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा क्रीडा संकुल अशा " एकता दौड" ( रन फॉर युनिटी ) चे आयोजन करण्यात आले आहे.  
परभणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सकाळी 7.30 वा. राजगोपालाचारी उद्यान ते जिल्हा क्रिडा संकुल येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एकता दौड बरोबरच राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात येणार आहे.  अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी तसेच मान्यवर नागरीक यांनी या राष्ट्रीय एकता दौडीमध्ये सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने आवाहन केले आहे.
०००००


पदवीधर मतदारांनी लवकर नाव नोंदणी करावी
– विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर
 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ ‍निवडणूक



औरंगाबाद, दिनांक ३० (जिमाका) – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक कार्यक्रमाबाबत विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी राजकीय पक्षांशी आज संवाद साधला. तसेच सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी पदवीधर मतदार नोंदणी लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली.
विभागीय आयुक्त यांच्या दालनात श्री. केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपायुक्त ‍शिवाजी ‍ शिंदे, उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मतदार नोंदणी नियम १९६० अंतर्गत नियम ३१ (३) अन्वये महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी पात्र मतदारांची नोंदणी करावयाचा कार्यक्रम निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त यांनी ०१ ऑक्टोबरपासून जाहीर केलेला आहे. मतदार नोंदणीसाठी एक ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर या कालावधीत पात्र पदवी अहर्ता, पात्र तत्सम अर्हता व्यक्तींना नमुना नं.१८ मध्ये मतदार नोंदणीसाठी अर्ज करता येईल. अर्जाचा नमुना तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विनामुल्य उपलब्ध आहे. या नोंदणीसाठी एक नोव्हेंबर २०१९ या अर्हता दिनांकापूर्वी किमान तीन वर्ष अगोदर पात्र पदवी अर्हता अथवा तत्सम पात्र पदविका इ. धारण करणा-या व्यक्तींना अर्ज करता येणार आहे. नमुना १८ च्या अर्जासह मूळ कागदपत्रे अथवा राजपत्रित अधिका-याकडून सांक्षांकित केलेल्या सत्यप्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदार ज्या ठिकाणी अर्ज करेल त्या ठिकाणचा सामान्यत: रहिवासी असावा. अर्जासोबत पदवी परीक्षेची, पदविका परीक्षेचे अंतिम गुणपत्रक देखील ग्राह्य धरले जाईल. मात्र, गुणपत्रकान्वये सदर व्यक्ती पास किंवा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणित झाले असले पाहिजे. शासकीय कार्यालयात सामाजिक उपक्रमामध्ये काम करणा-या व्यक्तीच्या अर्हताबद्दल संस्थेकडील अभिलेख पाहून कार्यालय प्रमुखांना मतदार नोंदणीसाठी विहित नमुन्यात प्रमाणपत्र देता येईल. तसेच विद्यापीठांकडील पदवीधारकांची नोंदणी, अभियंत्यांची नोंदणी, विधी अभिकर्त्याची नोंदणी, वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणी , सनदी लेखापालांची नोंदणी आदी नोंदणीबाबतचा दाखला अर्जासोबत अर्हतेबाबत पुरावा म्हणून देता येईल. तसेच राजकीय पक्ष संघटना अथवा कोणत्याही व्यक्तीस एका गठ्ठा अर्ज मिळणार नाहीत, तसेच एक गठ्ठा पद्धतीने अर्ज स्वीकारलेही जाणार नाहीत. मात्र, एका कुटुंबासाठी अथवा कार्यालय प्रमुख अथवा संस्थेस त्यांच्या कार्यालयातील कर्मचा-यांसाठी अर्जाची एकत्रित मागणी करता येईल व एकत्रित अर्ज सादर करता येतील.
प्राप्त मतदारांची प्रारूप यादी २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येऊन २३ नोव्हेंबर ते नऊ डिसेंबरपर्यंत संबंधितांना दावे, हरकती नोंदविता येतील. दिनांक ३० डिसेंबर रोजी मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. ‍विभागातील सर्व शासकीय कार्यालये, सर्व विद्यापीठे यांनी पदवीधर मतदार नोंदणीला प्राधान्य द्यावे व अधिकाधिक पदवीधर मतदारांची नोंदणी करावी.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रशिक्षण
जिल्हाधिकारी कार्यालयात 31 ऑक्टोबर 2019 रोजी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात सकाळी अकरा वाजता हे प्रशिक्षण होणार आहे.
******

Wednesday, 18 September 2019

शेती पूरक व्यवसायांना राज्य शासनाची पत हमी
मुंबई, दि. 18 : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या शेती पूरक व्यवसायासाठीच्या कर्जांना राज्य शासन पतहमी देणार आहे.
आतापर्यंत महामंडळाच्या योजनेचा लाभ 7 हजार 866 जणांना मिळाला असून बँकेमार्फत 400 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. महामंडळांकडून 3 हजार 700 लाभार्थींना 10 कोटींचा व्याज परतावा केलेला आहे. उर्वरीत लाभार्थींना व्याज परतावा देण्याचे काम सुरु आहे.
बँकामार्फत शेतीपूरक व्यवसायांकरिता कर्ज देताना अडचणी येत होत्या. त्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. क्रेडिट गँरटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल इंटरप्राईजेस अंतर्गत शेतीपूरक कर्जाला पत हमी देता येते.
 शेती पूरक व्यवसायांसाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेच्या धर्तीवरच क्रेडिट गॅरंटी फंडस फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायजेस आणि  क्रेडिट गॅरंटी फंडस ट्रस्ट फॉर मायक्रो अँड मिडीअम इंटरप्रायजेस या दोन्ही पत हमीच्या योजना यापुढील काळात महामंडळाच्या कर्जासाठी लागू  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळामार्फत सीजीटीएमएसई आणि सीजीएफएमयू या दोन्ही पत हमीच्या योजनांचे शुल्क बँकेत भरल्यावर त्याचा परतावा करण्यात येईल.
 या निर्णयानुसार राज्य शासनामार्फत बँकांना 25 सप्टेंबर 2018 रोजी क्रेडिट गँरटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल इंटरप्राईजेस अंतर्गत घेतलेल्या कर्जावरील पत हमी देण्याकरिता मंजुरी देण्यात आली आहे.

Friday, 13 September 2019

राज्यात ८५६ हेक्टर क्षेत्रावर ६८ वन उद्याने
-     सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 12 :  राज्यात ८५६.७१ हेक्टर क्षेत्रावर ६८  वन उद्यानांची निर्मिती प्रगतीपथावर असून यासाठी १३४ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
स्व. उत्तमराव पाटील वन उद्यान योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात २ वन उद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. उद्यानांचे काम प्रगतीपथावर असले तरी ही सर्व उद्याने नागरिकांसाठी खुली आहेत. उद्यानाच्या माध्यमातून फळवन, चंपकवन, कदंबवन, अशोकवन, आम्रवन, जंबुवन, वंशवन, मदनवृक्ष वन, चरक वन, लता वन, सारिका वन मगृसंचार वन, अतिथीवन यासारखी विविध प्रकारची उपवने, प्रिय व्यक्तीच्या नावे वृक्षारोपण करून स्मृतिवने निर्माण केली जात आहेत.
वन उद्याने
माजीवाडा, कानविंदे(ठाणे), कार्लेखिंड, चौल(रायगड), तेन, पापडखिंड (पालघर), खाणू, चिखली (रत्नागिरी), रानभाबूली, मुळदे (सिंधुदूर्ग), नऱ्हे, रामलिंग (पुणे), गुरेघर, पारगाव (सातारा), बोलवाड, खामबेले (सांगली) कुंभारी, मळोली (सोलापूर), कागल, पेठ वडगाव (कोल्हापूर), पठारी (औरंगाबाद), माणकेश्वर, गंगाखेड (परभणी), बोंदर, वदेपुरी (नांदेड), तीर्थ, ढोकी (उस्मानाबाद), जालना ट्रेनिंग सेंटर, दहीपुरी(जालना), एसआरपीएफ, पोतरा (हिंगोली), नारायणगड, सेलुम्बा (बीड), तांबरवाडी, नागझरी (लातूर), कुडवा, नवाटोला, मोरगाव, गराडा(गोंदिया), वर्धा एमआयडीसी, रांजणी (वर्धा), वेण्णा (नागपूर), डोंगराला (भंडारा), चंद्रपूर, गोंदेडा, गोंडपिंपरी (चंद्रपूर), धानोरा (गडचिरोली), पारेगाव, माणिकपुंज, कांदाने (नाशिक), जामखेळ (धुळे), कुंभारखोरी, बिलाखेड(जळगाव), नांदुरखी, आठवाड (अहमदनगर), कोथाडा, होल (नंदूरबार), उपटखेडा, मदलाबाद (अमरावती), वाशिम्बा, कुरुम, कटीबटी(अकोला), पिंपळखुटा, जानुना(बुलढाणा), आंबेवन, जोंधळणी (यवतमाळ), तपोवन, रामनगर(वाशिम) या जैवविविधता वन उद्यानाचा यात समावेश आहे.
            शहरांमधील नागरिकांमध्ये विशेषत : विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रजाती आणि वन्यजीवांविषयी आस्था निर्माण व्हावी, त्यांचे या गोष्टींकडे लक्ष आकर्षित व्हावे यासाठी त्यांना या उद्यानात अभ्यासाबरोबर क्रीडा-व्यायाम आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध करून दिली जात आहेत. वृक्ष-लतांचे महत्व आणि उपयोगिता सांगणारे पुस्तक संग्रहालय निर्माण करण्याचे व त्याद्वारे या सर्व माहितीचा प्रचार आणि प्रसार करण्याचेही यात नियोजित आहे.
०००००
महिला बचत गटांना २०० कोटी रुपयांचे खेळते भांडवल

मुंबई, दि. १3 :- राज्य शासनाने महिला बचत गटांना २०० कोटी रुपयांचे खेळते भांडवल दिले आहे. यामुळे बचत गटांमार्फत स्वयंरोजगारासाठी सुरु करण्यात आलेल्या विविध उपक्रमांना मोठ्याप्रमाणावर सहाय्य झाले आहे.
या बचत गटांच्या मार्फत महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी राज्यात गेल्या पाच वर्षात विशेष प्रयत्न करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून बचत गटातील १ लाख १४ हजार महिलांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षणही देण्यात आले.
बचत गटाच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यावर विशेष भर देण्यात आल्याने २०१४ नंतर ३ लाख ९७ हजार १३७ बचतगटांची निर्मिती झाली. यातील लाभार्थी कुटुंबांची संख्या ३२ लाख ८६ हजार १४६ इतकी आहे. याच कालावधीत २६ हजार ४६५ समूह गट आणि ६८८८ ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली.
0000

गाळमुक्त धरणाची प्रभावी अंमलबजावणी
९ कोटी ६४ लाख घनमिटर गाळ निघाला

मुंबई, दि १3 :- गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यात ९ कोटी ६४ लाख घनमिटर गाळ काढण्यात यश आले आहे. यामुळे ५२७० धरणे स्वच्छ झाली आहेत.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त धोरणाच्या अंमलबजावणीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. धरणात गाळ सतत साचत राहिल्याने त्यांच्या पाणी साठ्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला होता. २०१४ पासून या योजनेला गती देण्यात आली.
धरणातील गाळ काढण्याच्या या उपक्रमामुळे ४७ दशलक्ष घनमीटर पाणी साठ्यात वाढ झाली आहे. हा गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला असून त्यामुळे १.२५ लाख हेक्टर शेतजमिनीच्या सुपिकतेत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
00000

Friday, 6 September 2019


पुस्तकांच्या गावात 30 हजार पुस्तक;
दीड लाख वाचक प्रेमींची भेट!

मुंबई, दि. 6: भारतातील पहिले 'पुस्तकांचे गाव' अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील  भिलार या पुस्तकांच्या गावात गेल्या दोन वर्षात दीड लाखांहून अधिक वाचक पर्यटकांनी भेट दिली आहे. या गावात वाचक पर्यटकांसाठी 30 हजारहून अधिक पुस्तकांचा खजिना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी सुरु करण्यात आलेला'पुस्तकांचे गाव' हा उपक्रम आता नियमित योजना स्वरुपात रुपांतरित करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. त्यामुळे वाचक-पर्यटकांना याठिकाणी आणखी सुविधा उपलब्ध होतील.
भिलार येथे 4 मे 2017 पासून 'पुस्तकांचे गाव' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत या गावात 13 साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या ठिकाणी वाचकांसाठी दर्जेदार इंग्रजी पुस्तकेही उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. गेल्या २ वर्षांत गावकऱ्यांच्या आग्रहामुळे एकूण १० पुस्तक घरांचा या प्रकल्पात नव्याने समावेश करण्यात आला आहे.
शासनाचा पुढाकार आणि लोकसहभाग याचे ‘पुस्तकाचे गाव’ हेउत्कृष्ट उदाहरण आहे. पुस्तके ठेवण्यासाठीची जागा घरमालक, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन यांच्याकडून विनामोबदला देण्यात आली आहे. गावातील राहती घरे, निवारागृहे, शाळा व मंदिरे अशा 35 ठिकाणी विविध साहित्यप्रकारांची पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
इंग्लडमधील 'हे ऑन वे'च्या धर्तीवर भारतातील हे पहिले पुस्तकांचे गाव विकसित करण्यात आले आहे. या गावात येणारे पर्यटक कोणतेही पुस्तक विनामूल्य वाचू शकतात.
००००

Saturday, 31 August 2019

मराठवाड्यात पावसाचे पुनरागमन
विभागात 343 मि.मी. पाऊस
अनेक जिल्ह्यांत दमदार पाऊस

औरंगाबाद,दि. 31 (विमाका) :- अनेक दिवसानंतर मागील चोवीस तासांत मराठवाड्यातील अनेक तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावून सुखद धक्का दिला. विभागातील सर्वच जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. विभागात एकूण 343.29 मि.मी. पाऊस झाला आहे. औरंगाबाद, जालना, नांदेड जिल्ह्यातील काही मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
मागील चोवीस तासांत औरंगाबाद जिल्ह्यात 22.70 मि.मी. पाऊस झाला. औरंगाबाद तालुक्यातील चितेपिंपळगाव (80.00 मि.मी.) आणि वैजापूर तालुक्यातील गारज (80 मि.मी.) मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जालना जिल्ह्यात 32.59 मि.मी. पाऊस झाला आहे. जालना तालुक्यातील जालना (75 मि.मी.), पाचनवडगाव (70 मि.मी.), भोकरदन तालुक्यातील भोकरदन (77 मि.मी.), राजूर (79 मि.मी.) मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. परभणी जिल्ह्यात 21.63 मि.मी. पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यातील झरी बु.(83 मि.मी.) मंडळात अतिवृष्टी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात 17.83 मि.मी. पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात 25.03 मि.मी. पाऊस झाला आहे. कंधार तालुक्यातील कुरूला (70 मि.मी.), उस्माननगर (80 मि.मी.), फुलवळ (80 मि.मी.), लोहा तालुक्यातील कलंबर (92 मि.मी.) आणि कापशी (79 मि.मी.) मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यात 16.15 मि.मी. पाऊस झाला आहे. बीड तालुक्यातील पिंपळनेर (95 मि.मी.) मंडळात अतिवृष्टी झाली आहे. लातूर जिल्ह्यात 28.12 मि.मी. पाऊस झाला आहे. चाकुर तालुक्यातील शेळगाव (72 मि.मी.) मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 13.86 मि.मी. पाऊस झाला आहे. उमरगा तालुक्यातील नारगवाडी (77 मि.मी.) मंडळात अतिवृष्टी झाला आहे.
जिल्हानिहाय  आजपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. औरंगाबाद- 360.22 मि.मी, जालना -317.48  मि.मी, परभणी -312.65 मि.मी, हिंगोली - 407.96 मि.मी, नांदेड 520.83 मि.मी, बीड 202.06 मि.मी. लातूर 334.29 मि.मी, आणि उस्मानाबाद 290.85 मि.मी.
आज सकाळी मागील चोवीस तासांतील पाऊस व कंसात आजपर्यंत झालेला पाऊस याची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
औरंगाबाद जिल्हा- औरंगाबाद 34.00 (307.90), फुलंब्री 30.25 (358.50), पैठण 35.00 (268.63), सिल्लोड 6.50 (475.69), सोयगाव 8.67 (536.33), वैजापूर 28.40 (319.00), गंगापूर 23.78 (288.00), कन्नड 27.00 (387.63), खुलताबाद 10.67 (300.33). जिल्ह्यात एकूण 360.22 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जालना जिल्हा- जालना 40.00 (261.19), बदनापूर 45.20 (312.80), भोकरदन 37.38 (433.75), जाफ्राबाद 19.20 (332.80), परतूर 25.16 (312.42), मंठा 18.75 (292.00), अंबड 40.00 (316.57), घनसावंगी 35.00 (278.29), जिल्ह्यात एकूण 317.48 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
परभणी जिल्हा- परभणी 26.75 (282.31), पालम 5.67 (262.33), पूर्णा 34.80 (421.40), गंगाखेड 30.75 (318.00), सोनपेठ 30.00 (309.00), सेलू 15.20 (274.00), पाथरी 11.00 (283.33), जिंतूर 26.17 (305.83), मानवत 14.33 (357.67), जिल्ह्यात एकूण पावसाची नोंद 312.65 मि.मी. झाली आहे.
हिंगोली जिल्हा- हिंगोली 16.86 (376.86), कळमनुरी 2.17 (489.08), सेनगाव 10.83 (368.83), वसमत 18.29 (302.29), औंढा नागनाथ 41.00 (502.75). जिल्ह्यात एकूण 407.96 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्हा- नांदेड 23.13 (528.75), मुदखेड 25.00 (562.00), अर्धापूर 25.00 (445.66), भोकर 2.75 (508.25), उमरी 20.67 (513.79), कंधार 60.83 (493.83), लोहा 54.50 (452.25), किनवट 7.43 (676.76), माहूर 13.00 (666.81), हदगाव 4.86 (466.56), हिमायत नगर 14.67 (570.99), देगलूर 25.00 (387.66), बिलोली 23.80 (554.40), धर्माबाद 34.67 (539.67), नायगाव 41.40 (517.20), मुखेड 23.71 (448.71), जिल्ह्यात एकूण 520.83 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
बीड जिल्हा- बीड 18.91 (210.18), पाटोदा 1.75 (222.50), आष्टी 3.80 (179.14), गेवराई 27.70 (185.00), शिरुर कासार 20.33 (149.67), वडवणी 36.00 (222.50), अंबाजोगाई 16.40 (187.60), माजलगाव 19.17 (286.70), केज 1.57 (166.29), धारुर 11.67 (166.00), परळी 20.40 (247.11), जिल्ह्यात एकूण 202.06 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
लातूर जिल्हा- लातूर 13.25 (216.25), औसा 17.86 (233.57), रेणापूर 22.50 (283.75), उदगीर 31.86 (326.00), अहमदपूर 47.67 (469.83), चाकुर 49.80 (320.60), जळकोट 20.50 (447.50), निलंगा 31.75 (375.88), देवणी 28.67 (361.50), शिरुर अनंतपाळ 17.33 (308.00), जिल्ह्यात एकूण 334.29 मि.मी. पाऊस झाला आहे.
उस्मानाबाद जिल्हा- उस्मानाबाद 5.75 (282.25), तुळजापूर 17.57 (382.29), उमरगा 32.00 (382.80), लोहारा 54.00 (427.33), कळंब 1.33 (216.67), भूम 0.20 (241.50), वाशी 0.00 (253.00), परंडा 0.00 (141.00), जिल्ह्यात एकूण 290.85 मि.मी. पाऊस झाला आहे.
******

Thursday, 29 August 2019

अटल महापणन विकास अभियान अंतर्गत विविध 
उपक्रमाबाबत जनजागृती लोक संवाद मोहिम प्रारंभ
औरंगाबाद, दि.29, (विमाका) :- अटल महापणन विकास अभियान अंतर्गत विविध उपक्रमाबाबत जनजागृती लोक संवाद मोहिमेचा प्रारंभ झाला, या लोकसंवाद मोहिमे अंतर्गत औरंगाबाद विभागाचा विभागस्तरीय कार्यक्रम विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, औरंगाबाद यांचे कार्यालयामध्ये दि.27 ऑगस्ट रोजी पार पडला. 
या कार्यक्रमाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या, मराठवाडा विभागाचे माहिती संचालक गणेश रामदासी यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था योगीराज सुर्वे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अनिलकुमार मु.दाबशेडे, जिल्हा पणन अधिकारी उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागीय कार्यालय औरंगाबाद जिल्ह्यातील उप/सहायक निबंधक, सहकारी संस्था ता.सर्व व जिल्हा व्यवस्थापक, सहकार विकास महामंडळ पुणे उपस्थित होते. 
माहिती संचालक गणेश रामदासी यांनी मार्गदर्शन केले की, सदर अभिनव संस्थांचे उत्पादनाचे ब्रँडींग होणे गरजेचे आहे. सदर संस्थांची माहिती ही फेसबुकवर सुध्दा अद्ययावत करावी जेणे करुन लोक संवाद साधण्यास मदत होईल. तसेच आपले कडील प्रसिध्द असलेली धान्ये जसे ज्वारी, बाजरी इ. हे उत्तर भारतामधील मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे संस्थेच्या मालाची विक्री सदर बाजारपेठेमध्ये केली गेली पाहिजे. 
यावेळी योगीराज सुर्वे यांनी सांगितले की, महाराष्ट्र सहकारी पणन महासंघ, खरेदी विक्री संघ व विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांचे बळकटीकरण करण्यासाठी दिनांक 25 डिसेंबर 2016 पासून राज्यात अटल महापणन विकास अभियान राबविण्यात येत आहे. खरेदी विक्री संघ व विविध कार्यकारी सहकारी संस्थांना नाविण्यपूर्ण उपक्रम/व्यवसाय सुरू केले आहेत. ही कामे विविध प्रसारमाध्यमांतून सहकारी संस्था शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट, शेतकरी व सर्वसामान्य लोकांपर्यत पोहोचविणे गरजेचे आहे, जेणेकरुन सहकारी संस्थांनी सुरू केलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांचा लाभ लोकांना मिळणे व त्यासोबतच, आर्थिकदृष्ट्या सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी मदत होईल. राज्यात 5000 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सक्षमीकरणाचे उद्दिष्ट आहे.
औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली हे चार जिल्हे आहे. जानेवारी 2019 पर्यंत सदर उपक्रमांतून केलेल्या कामांची माहिती पुढील प्रमाणे आहे. औरंगाबाद विभागात एकूण 31 तालुके असून प्रत्येक तालुक्यात पणन व्यवस्थेतील 15 संस्था असे एकूण 465 संस्थांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी VSTF मधील 1000 गावांपैकी संस्था याप्रमाणे निवडलेल्या संस्था संख्या 19 आहे. विभागातील Business Development Plan (व्यवसाय विकास आराखडा) तयार केलेल्या संस्थांची संख्या 84 आहे. औरंगाबाद विभागातील पणन व्यवस्थेतील निवड केलेल्या संस्थांपैकी Royal Agro पार्टनर संस्थांची सामंजस्य करार (MOU) केलेल्या संस्था 369 आहे. औरंगाबाद विभागातील नवीन व्यवसाय केलेल्या 84 संस्थांनी एकूण व्यवसायात झालेली गुंतवणूक रुपये 204.96 लाख इतकी झालेली आहे. नवीन व्यवसायात आजपर्यंत झालेली उलाढाल रुपये 83.42 लाख इतकी झालेली आहे. नवीन व्यवसायापासून संस्थेला मिळालेला एकूण उत्पन्न रुपये 41.44 लाख इतके झाले आहे. नवीन व्यवसायातील संस्थेला मिळालेला निव्वळ नफा रुपये 29.33 लाख इतका झालेला आहे. या माध्यमातून 145 रोजगार निर्मिती झालेली आहे. अटल महापणन विकास अभियानाच्या प्रथ्ज्ञम व द्वितीय वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना अटल अटल महापणन पुरस्कार देण्यासाठी विभाग समितीने खरेदी विक्री संघ व जिल्हा समितीने विविध कार्यकारी सेवा सहकार संस्थांची प्रथम, द्वितीय व तृतीय अशी संस्थांची निवड करुन पात्र संस्थांना प्रथम वर्ष सन 2016-17 व द्वितीय वर्ष सन 2017-18 मध्ये अटल महापणन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. उपरोक्त उपक्रमातून पणन व्यवस्थेतील सहकारी संस्थांसाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे (MCDC) यांचे मार्फत अटल अर्थसहाय्य योजना राबविण्यात आली असून या माध्यमातून औरंगाबाद विभागातील जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था औरंगाबाद,जालना, परभणी, व हिंगोली यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांकडून प्राप्त झालेले अर्थसहाय्याचे प्रस्ताव महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे यांना सादर केले आहे. कॉप शॉप-शहरी सहकारी हौसिंग सोसायटी, मार्केटिंग फेडरेशन, ग्रामीण सहकारी संस्था, इतरचे कॉप शॉपची माहिती प्रपत्र-अ व प्रपत्र-ब मध्ये देण्याचे सूचना सर्व जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आल्या आहेत.